मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
कोर्टात वापरले जाणारे शब्द हे सामान्य मनसाच्या डोक्यावरुन जातात, त्यामुळेच कोर्टात आपली बाजू लढवण्यासाठी एका चांगल्या वकील साहेबांची नेमणूक करणे आवश्यक ठरते. तुम्ही कधी कोर्ट रूम मध्ये बसला असाल, तिथे जज साहेब आणि वकील साहेबांचे संभाषण कान लावून ऐकले असेल तर त्यांच्या संभाषणातील 50% शब्द नसमजणारे असतील.
कोर्टात एखाद्या दिवाणी दाव्यामद्धे वारंवार वापरले जाणारे असेच दोन शब्द म्हणजे लेखी कैफियत आणि से. आजच्या या कायदे विषयक लेखात आपण लेखी कैफियत म्हणजे काय, से म्हणजे काय, आणि या दोघांमधील नेमका फरक काय हे अगदी समजेल अश्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू.
मित्रांनो, वकील साहेब जेंव्हा आपल्या पक्षकारांना त्यांच्या प्रकरणासंबंधी माहिती देत असतात तेंव्हा ते वारंवार कैफियत दाखल करायची आहे, से दाखल करायचा आहे अश्या प्रकारचे वाक्य वापरतात. कायद्याशी संबंध नसलेल्या सामान्य माणसांना त्या वाक्याचा अर्थ समजत नसतो, परंतु ते वकील साहेबांना अर्थ विचारण्याचे कष्ट घेत नाहीत. एखाद्या पक्षकाराने प्रश्न विचारलाच, तर वकील साहेबांकडे ते समजाऊन सांगण्यासाठी वेळ नसतो. या सर्व गोष्टी सामान्य पक्षाकारांना समजाव्या यासाठीच हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लेखी कैफियत : दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 8, रूल 1 मध्ये लेखी कैफियतची कायदेशीर व्याख्या नमूद केलेली आहे. ही कायदेशीर व्याख्या आपण आपल्याला समजेल अश्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू.
जेंव्हा एखादी व्यक्ती (वादी) दिवाणी न्यायालयात एखादा दावा दाखल करतो, तेंव्हा समोरच्या पार्टीला (प्रतिवादी) त्या दाव्यास उत्तर देणे गरजेचे असते. वादीच्या दाव्याला प्रतिवादीने दिलेले लेखी उत्तर म्हणजे लेखी कैफियत. इंग्रजी मध्ये याला Written Statement असे म्हणतात.
कोणत्याही दिवाणी स्वरुपाच्या वादामध्ये ‘दावा’ आणि त्या दाव्याचे उत्तर, म्हणजेच ‘लेखी कैफियत’ हे अत्यंत महत्वाचे घटक समजले जातात. वादी आणि प्रतिवादीने त्यांच्या दाव्यात आणि लेखी कैफियत मध्ये मांडलेल्या मुद्द्यांपासून त्यांना फारकत घेता येत नाही, त्यामुळे कोणताही दावा दाखल करताना किंवा दाव्याची लेखी कैफियत दाखल करताना ती वारंवार वाचून आणि अभ्यासून घेतली पाहिजे.
से ( जबाब ) : जेंव्हा दाव्यामधील कोणतीही पार्टी कोर्टासमोर एखादा अर्ज सादर करते, तेंव्हा कोर्ट विरुद्ध पार्टीला त्या अर्जावर त्याचे मत किंवा उत्तर मागवते. एखाद्या अर्जावर विरुद्ध पार्टीने दिलेले उत्तर म्हणजेच ‘से’ किंवा ‘जबाब’.
दोन्हीमद्धे नेमका फरक काय आहे? : आपण वर पाहिल्या प्रमाणे वादीच्या दाव्याला प्रतिवादीने दिलेले उत्तर म्हणजे लेखी कैफियत, आणि दाव्या दरम्यान दाखल केलेल्या कोणत्याही अर्जावर समोरच्या पार्टीने दिलेले उत्तर म्हणजे से. आता तुम्हाला लेखी कैफियत आणि से यामधील मुख्य फरक समजलेला असेल, तर आता याबद्दल आपण पुढील माहिती समजून घेऊ.
मित्रांनो, एखाद्या दाव्यामद्धे लेखी कैफियत ही फक्त एक वेळाच दाखल करता येते, आणि ती प्रतिवादी तर्फेच दाखल केली जाऊ शकते. प्रतिवादिस लेखी कैफियत दाखल करण्यासाठी समन्स मिळालेच्या तारखेपासून 30 दिवसांचा कालावधी देण्यात येतो, पुढे हा कालावधी समन्स मिळालेच्या तारखेपासून 90 दिवस इतपर्यंत वाढवता येतो.
से किंवा जबाब हा दाव्यामद्धे अनेक वेळा देण्यात येतो. एखाद्या दाव्यामद्धे वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळे अर्ज दाखल करण्यात येतात. त्या प्रत्येक अर्जावर समोरील पार्टीला वेळोवेळी आपले उत्तर द्यावे लागते. ‘से’ हा वादी किंवा प्रतिवादी या दोघांना देखील देण्याची आवश्यकता भासू शकते.
लेखी कैफियत आणि से हा आपण एका उदाहरणाने समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला अधिक चांगल्याप्रकारे समजून येईल. समजा सुरेशने रमेश विरुद्ध अतिक्रमण हटवण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. त्या दाव्यासोबत सुरेशने तूर्तातूर्त मनाईचा अर्ज देखील दाखल केला.
आता रमेशला या दाव्याचे समन्स मिळाले आणि तो वकील साहेबांकडे गेला. तेंव्हा वकील साहेबांनी प्रकरण समजून घेऊन दाव्याचे लेखी उत्तर तय्यार करून घेतले. सोबतच वादीने तूर्तातूर्त मनाईचा अर्ज देखील दाखल केलेला असल्यामुळे त्या अर्जाचे उत्तर म्हणजेच ‘से’ देखील तय्यार करून घेतला आणि दोन्ही दाखल केले.
या उदाहरणावरून आपल्याला लेखी कैफियत आणि से मधील फरक चांगल्या प्रकारे समजला असेल. तुम्हाला याबद्दल अजून काही शंका असेल किंवा प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये जरूर विचारा, त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.