मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आपण ज्या वेळेस एखाद्या करारनामा करत असतो सामान्यतः तो नोटराईज करून घेण्याकडे आपला कटाक्ष असतो. या मागे एकच कारण असते की जर कोर्टामध्ये तो करार दाखल केला तर आपल्याला एक सुरक्षितता मेळावी. परंतु, नोटराईज करारनामा देखील कसा करून घ्यावा याबद्दल अनेक जणांना माहिती नसते आणि अशी चुकीच्या पद्धतीने केलेली नोटरी कोर्टासमोर गेली की मग तिची Evidential Value कमी होते.
आजच्या या लेखात आपण नोटरी करारनामा कसा करून घ्यायचा की ज्यामुळे भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होऊ नये याबाबत माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि महितीशीर वाटल्यास आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेयर करा.
सामान्यपणे नोटरीचे कामकाज करारनामा नोटराईज करणे, मृत्युपत्र नोटराईज करणे, मुखत्यारपत्र नोटराईज करणे, स्टॅम्प पेपरवर तयार केलेले ॲफिडेव्हिट साक्षांकित करणे, तसेच जर कोणी मूळ कागदपत्रे आणि त्याची झेरॉक्स घेऊन त्यांच्याकडे गेले तर त्याची ट्रू-कॉपी म्हणजे सत्यप्रत करून द्यायचे असते. परंतु असे बरेचदा पाहण्यात येते की आपण पैसे आणि वेळ वाचवण्यासाठी फक्त नोटरीचा लाल शिक्का असावा यासाठी गडबडीमध्ये नोटरी करून घेतो.
ही पद्धत अगदी अयोग्य आहे. जेंव्हा विषय नोटरीच्या योग्यतेचा येतो त्याबाबतची तरतूद नोटरी रूल्सच्या रूल क्रमांक 11 मध्ये घालून दिलेली आहे. या नियमाप्रमाणे नोटरीचा जो काही दस्तऐवज करावयाचा असतो तो रजिस्टर मध्ये नोंद होणे आवश्यक असते. हे रजिस्टर एक प्रकारचे सरकारी रेकॉर्डचे काम करते. रजिस्टर पूर्ण भरले की ते जिल्हा न्यायालय किंवा जिल्हाधिकारी यांचेकडे तपासणीसाठी जमा करावयाचे असतो.
जेंव्हा नोटरीने केलेल्या एखाद्या दस्तऐवज बाबत काही वाद निर्माण होतो त्यावेळेस कोर्ट नोटरीस त्या संबंधीचे रजिस्टर आणि रेकॉर्ड सोबत हजर राहण्यासाठी समन्स काढत असते आणि त्या अनुषंगाने नोटरीची साक्ष देखील घेतली जाते. परंतु जर एखादा दस्तऐवज त्या नोटरी रजिस्टर मध्ये नोंद केलेला नाही तर अशा परिस्थितीत ते नोटरी दस्तऐवज कोर्टा समोर शाबीत होऊ शकत नाही.
ही गोष्ट आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा रमेशने त्याच्या मृत्यूपूर्वी एक मृत्युपत्र बनवून ते नोटराईज करून ठेवले होते. रमेशच्या मृत्यूनंतर ते मृत्यूपत्र कोर्टात आव्हणीत झाले. त्याच प्रमाणे कोर्टाने नोटरी करणारे वकिलांना साक्ष देण्यासाठी नोटरीचे रजिस्टर घेऊन कोर्टात बोलवले. परंतु जर त्या मृत्यूपत्राची नोंदच नोटरी रजिस्टर मध्ये नसेल तर कोर्ट ते नोटरी केलेले मृत्यूपत्र ग्राह्य धरणार नाही. यामुळे त्या दाव्याचा निकाल विरोधात जाईल.
त्यामुळे ज्या वेळेस आपण कोणताही दस्तऐवज नोटरी करत असतो त्यावेळेस तो दस्तऐवज रजिस्टरला नोंद होईल याबद्दल खात्री करून घ्यावी. म्हणजेच नोटरी रजिस्टरला लिहून घेणार, लिहून देणार, त्याच प्रमाणे दोन साक्षीदारांची नावे आणि सर्वांच्या सह्या रजिस्टरवर असणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचबरोबर त्या रजिस्टरमधील ज्या तारखेस आणि सिरीयल नंबरला आपला दस्तऐवज नोंदवला असेल तोच सिरीयल नंबर आपल्या दस्तऐवजावर आहे का याबाबत खात्री करून घ्यावी.
आपण जो काही मजकूर आपल्या दस्तऐवज मध्ये लिहिला आहे त्याचा सारांश देखील रजिस्टर मध्ये लिहिलेला आहे किंवा नाही याबाबत देखील खात्री करून घेणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला एखादे Affidavit करून घ्यायचे असेल तर ते एफिडेविट शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर असणे आवश्यक असते अन्यथा स्टॅम्प पेपरवर नसलेले एफिडेविट ओथ कमिशनर यांचेकडून करून घ्यायचे असते. त्याचप्रमाणे दस्तऐवज तयार करताना ते टाईप करणाऱ्या व्यक्तिला सविस्तर माहिती दिली पाहिजे जेणे करून तुम्हाला भविष्यात काही अडचण निर्माण होणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नोटरी कशा पद्धतीने करून घ्यावी त्याबाबत सविस्तर माहिती घेतलेले आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.