मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आपल्या देशात जमिनीबद्दलचे वाद हे काही नवीन नाहीत. जमीन स्वतः खरेदी केलेली असो किंवा आजोबा-पंजोबा यांच्याकडून मिळालेली असो, जमिनीबद्दल घरा-घरात वाद-विवाद पहायला मिळणे आपल्यासाठी काही नवीन नाही. अश्यातच कुळ कायद्याने एखाद्या व्यक्तीला काही जमीन मिळालेली असेल तर त्याबद्दल देखील पुढे चालून असे वाद दिसू लागतात.
कुळ कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीबद्दल असलेल्या एका वादाचा प्रश्न आपल्या एका वाचकाने आम्हाला विचारला. कुळ कायद्याअंतर्गत मिळालेली जमीन, ती व्यक्ती अनेक वारसां पैकी एखाद्याच वारसाला देऊ शकते का? किंवा त्याच्या लाभात हस्तांतरित करू शकते का? अश्या या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या कायदेविषयक लेखात जाणून घेऊ.
सर्व प्रथम कुळाची जमीन म्हणजे नेमके काय हे आपण समजेल अश्या भाषेत जाणून घेऊ. जेंव्हा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची जमीन प्रत्यक्षात दूसरा व्यक्ती कसतो तेंव्हा त्या दुसर्या व्यक्तीला ‘कसेल त्याची जमीन’ या तत्वानुसार आणि ‘कुळ कायद्याच्या’ तरतुदीनुसार संबंधित जमिनीची मालकी मिळते. कायद्याच्या पुस्तकात याची व्याख्या खूप क्लिष्ठ आहे, त्यामुळे आपण थोडक्यात आणि आपल्याला समजेल अश्या शब्दात ही व्याखा समजून घेतली आहे.
आता कुळ कायद्या अंतर्गत संबंधित जमिनीची मालकी एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते हे इथे स्पष्ठ होते. या प्रकरणात मालकी हक्कांचे हस्तांतरण ज्या पद्धतीने होते, त्यानुसार दुसर्या व्यक्तीसाठी ही जमीन स्वकष्टर्जित स्वरूपाची होते असाच आपल्याला तर्क किंवा निष्कर्ष काढायला लागतो.
स्वकष्टर्जित मालमत्तेबद्दल जर बोलायचे झाले तर ज्या व्यकीच्या नावावर ती मालमत्ता आहे त्या व्यक्तीला त्या मालमत्तेसंबंधी कोणताही निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार असतो. स्वकष्टर्जित मालमत्ता असेल तर ती व्यक्ती त्या मालमत्तेची विक्री करू शकतो, एखाद्याला बक्षीस पत्राने ती मालमत्ता हस्तांतरीत करू शकतो, ती मालमत्ता गहाण ठेवू शकतो. हे सर्व करताना त्या व्यक्तीला इतर कोणाचीही परवानगी घेण्याचे गरज नसते हे आपणास माहीत आहे.
तर आता वाळूय आपल्या मूळ प्रश्नाकडे. कुळ कायद्याअंतर्गत मिळालेली जमीन ही स्वकष्टर्जित जमीन समजण्यात येते, त्यामुळे आपण स्वकष्टर्जित जमिनीबाबत वर पाहिलेल्या माहिती नुसार आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते. कुळ कायद्याअंतर्गत मिळालेली जमीन फक्त एकाच वारसाला देता येते का? तर याचे उत्तर हो असे राहील. परंतु हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा ज्या व्यक्तीच्या नावावर कुळ लागलेले आहे ती व्यक्ती हयात असेल आणि त्या व्यक्तिद्वारे हे हस्तांतरण केले गेले असेल किंवा त्या व्यक्तीने आपल्या मृत्युपत्रात असे नमूद केलेले असेल तरच.
ज्या व्यक्तीच्या नावावर कुळ लागलेले असेल ती व्यक्ती त्या कुळाच्या जमीनिबाबत कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण करण्यापूर्वी मयत झाला असेल, त्या व्यक्तीने कुळाच्या जमिनीसंबंधी मृत्यूपत्र केलेले नसेल तर मात्र वारसाहक्काने त्या मयत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे त्या कुळाच्या जमिनीला लावणे बंधनकारक आहे. या परिस्थितिमध्ये कुळ कायद्याअंतर्गत मिळालेली जमीन फक्त एकाच वारसाला देणे कायद्याच्या विरुद्ध ठरते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.