हक्कसोड पत्र म्हणजे काय? हक्कसोड पत्र कसे करावे? जाणून घ्या सबंधीची सविस्तर माहिती सोप्या भाषेत.

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

आपण बरेच वेळा पाहतो की एखाद्याच्या घरी वडिलांचा मृत्यू झाल्या नंतर त्यांच्या नावावरील जमीन भावा-भावांमध्ये वाटणी करायची असेल किंवा एखाद्या बहिणीच्या नावावरील जमीन भावाला द्यायची असेल तर हक्कसोड पत्राचा वापर केला जातो. एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी त्याच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी, केला जाणारा दस्त म्हणजे हक्कसोड पत्र. एकाच कुटुंबातील प्रॉपर्टी हस्तांतरण करण्यासाठी अत्यंत कमी खर्चात हा फेरफार होतो.

हक्कसोड पत्र म्हणजे जमिनीचा फेरफार करण्यासाठी वारसा हक्काने मिळालेली जमीन एकाच कुटुंबातील दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर केला जाणारा दस्त. हा दस्त अत्यंत कमी खर्चामध्ये (साधारण पणे 200 रु. स्टॅम्प पेपर) वरती आपण बनवून घेऊ शकतो. मात्र हक्कसोड पत्र म्हणजे नेमके काय? हे कशा प्रकारे केले जाते? हे कोण करू शकतो? याची नोंदणी आवश्यक आहे का? नोंदणी कशी करायची? कुठल्या कार्यालयात करायची? या सर्वांबद्दलची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज घेणार आहोत.

सर्वात प्रथम आपण हक्कसोड पत्र म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एकत्र कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने त्याच्या एकत्र कुटुंबातील मिळकती वरील त्याचा स्वतःचा वैयक्तिक हक्क ( जो वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीत आहे ) आपल्या एकत्र कुटुंबांमधील इतर सदस्याच्या नावे स्वेच्छेने आणि कायमस्वरूपी सोडून दिल्याबद्दल कागदोपत्री केलेला पुरावा. यालाच आपण हक्कसोड पत्र असं म्हणतो.

हक्कसोड पत्र कोण करू शकतं? : यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे हक्कसोड पत्र करण्यासाठी सर्व व्यक्ति एकाच कुटुंबातील असणे आवश्यक असते. एका उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर, समजा एका कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मयत झाली. या व्यक्तीच्या नावे त्याने स्वतः विकत घेतलेली शेतजमीन, वडीलोपार्जित मिळालेले घर आहे. या व्यक्तीच्या पश्च्यत त्याची बायको, त्याचे 2 मुले आणि 2 मुली आहेत. तर या उदाहरणात त्या मृत व्यक्तीच्या पश्चात वारसदार म्हणून त्याची बायको, 2 मुले आणि 2 मुलींचे हे शेतजमीन आणि घराचे सामायिक हिस्सेदार बनतात. आता, मृत व्यक्तीच्या वारसदारांपाइकी कोणताही एक किंवा अधिक वारस आपल्या हक्कातील प्रॉपर्टी इतर वारसाच्या नावात करू शकतो.

हक्कसोडणार्‍या व्यक्तीला काही मोबदला मिळतो का? : एका वाक्यात सांगायचे झाले तर कायद्यामद्धे याबाबत कोणतीही स्पष्ट तरुतूद नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये याबाबत वेगवेगळे मत पहण्यास मिळते. काही कुटुंबामध्ये कोणताही मोबदला न घेता प्रॉपर्टीवरील हक्क सोडला जातो तर काही कुटुंबामध्ये काही अटी-शर्ती, किंवा मोबदला स्वीकारून हक्कसोड पत्र केले जाते. या दोन्ही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने मान्य आहेत. ज्या त्या कुटुंबातील सदस्य याबाबत निर्णय घेऊ शकतात. कायद्याने यावर कोणतेही बंधन नाही.

हक्कसोड पत्र नोंदणीकृत असावे का? : काही वेळा आपण असे पाहतो की कुटुंबातील सदस्य 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून हक्कसोड पत्र करून घेत असतात. आणि तलाठी मार्फत गैर मार्गाने याबाबतचा फेरफार मंजूर करून घेत असतात. परंतु ही चुकीची पद्धत आहे, ज्यामुळे भविष्यात कायदेशीर पेच निर्माण होऊ शकते. पुढे हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचते. या प्रकरणाचा निर्णय कोर्टात झालेल्या पुराव्यांच्या माध्यमातून होतो. आणि आपणा सर्वांना माहीतच असेल की नोंदणीकृत दस्त हा कोर्टात एक Valid पुरावा म्हणून मान्य केला जातो. याउलट नोटरी केलेला दस्त हा आपल्याला कोर्टात सिद्ध करण्यासाठी बरीच मेहनत आणि कष्ट घ्यावे लागते. त्यामुळे पुढीच त्रास टाळण्यासाठी हक्कसोड पत्र हे नोंदणीकृत असणे कधीही योग्यच मानले जाते.

हक्कसोड पत्र हे नोंदणीकृत असले पाहिजे, याबाबत मालमत्ता हस्तांतरण कायद्यात अशी स्पष्ट तरतूद देखील केलेली आहे. त्यामुळे कोणतेही हक्कसोड पत्र हे सबरजिस्टरार ऑफिस मध्ये नोंद केलेले असावे. हे हस्तांतरण एकाच कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर केलेले असते, त्यामुळे यावर अगदी कमी मुद्रांक शुल्क भरावे लागते. अगदी 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेले हक्कसोड पत्र देखील नोंदणीस पात्र ठरते व त्याची नोंदणी केली जाते. पुढे, असे नोंदणीकृत हक्कसोड पत्र आपण तलाठी यांच्याकडे देऊन त्याबाबतचा फेरफार मंजूर करून घेणे आवश्यक आसते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *