हिंदू वारसा कायद्यानुसार वर्ग 1 चे वारस कोण असतात? जाणून घ्या समजेल अश्या उदाहरनाद्वारे.

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

हिंदू वारसा कायद्यानुसार ज्यावेळी एखादा व्यक्ती त्याच्या प्रॉपर्टीबाबत कोणत्याही प्रकारचे मृत्युपत्र न करता मृत्यू पावतो, अश्या परिस्थिति मध्ये ती प्रॉपर्टी त्याच्या वर्ग-1 च्या वारसांकडे वारसाहक्काने जाते. परंतु वर्ग 1 वारस म्हणजे नक्की कोण? पत्नी, मुलगा, मुलगी फक्त एवढेचं वर्ग-1 च्या वारसांमध्ये येतात का? याबद्दल आजच्या या लेखात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आपणास वाचून आश्चर्य वाटेल परंतु वर्ग 1 मध्ये एकूण 16 प्रकारचे वारस हिंदू वारसा कायदा, 1956 चे कलम 10 मध्ये सांगितलेले आहेत. जर वर्ग 1 चे वारस नसतील तरच वर्ग 2 च्या वारसांकडे ती प्रॉपर्टी जाते. कायद्याचा अभ्यास नसलेल्या व्यक्तींनी हिंदू वारसा कायद्याचे कलम 10 वाचले तर त्यांना ती भाषा अजिबात लक्षात येत नाही, कारण त्यामधील भाषा थोडी अवघड आहे. त्यामुळे आपण अगदी सोप्या भाषेत  हे कलम समजून घेऊ.

हे कलम समजून घेण्यासाठी एक सोपे उदाहरण घेऊयात. समजा A नावाचा व्यक्ती हा मृत्यूपत्र न करता मयत झाला. आता त्याच्या नावावर असलेल्या स्व्कष्टार्जित प्रॉपर्टी मध्ये पुढील प्रमाणे वर्ग 1 चे वारस असतील. आई (M) , बायको (W), मुलगा (S), मुलगी (D). या चार पैकी सर्वच व्यक्ती जीवंत असतील तर हे कलम काहीच किचकट वाटणार नाही. हे चार वारस जीवंत असतील तर इतर कोणाचा वारस म्हणून समावेश होत नाही.

1. परंतु, वरील 4 पैकी मुलगा (S) हा मयत असेल, त्याच्या पश्च्यात त्याची बायको, मुले-मुली असतील तर वर्ग 1 च्या वारसांमध्ये वाढ होते. अश्या परिस्थितीमध्ये कलम 10 नुसार S ची विधवा (SW), S चा मुलगा (SS) आणि S ची मुलगी (SW) असे 3 प्रकारच्या वरसांची वर्ग 1 च्या वारसांमध्ये वाढ होते. या वरसांचा S च्या हिस्स्यात येणार्‍या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क असतो.

2. आता असे समजू की, वरील मुद्दा क्र. 1 मध्ये असलेला S चा मुलगा (SS) हा देखील मयत झालेला आहे. S चा मुलगा (SS) याचे देखील लग्न झालेले आहे आणि त्याच्या पश्च्यात त्याची विधवा, मुलगा आणि मुलगी आहेत. तर अश्या परिस्थिती मध्ये SS ची विधवा (SSW), SS चा मुलगा (SSS) आणि SS ची मुलगी (SSD) हे देखील वर्ग 1 चे वारस समजण्यात येतील. या वरसांचा SS च्या हिस्स्यात येणार्‍या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क असतो.

3. आता असे समजू की, मुख्य वारसांपैकी A या व्यक्तीची मुलगी (D) हे देखील मयत आहे. तर अश्या परिस्थितीमध्ये D च्या पश्च्यात, D ची मुलगी (DD) आणि D च मुलगा (DS) हे देखील वर्ग 1 चे वारस समजण्यात येतील. येथे D च्या नवर्‍याला वारस म्हणून ग्राह्य धरले जात नाही.

4. 2005 पूर्वी हिंदू वारसा कायद्यामद्धे दुरूस्ती होण्यापूर्वी वरील 12 प्रकारचे वारस हे वर्ग 1 चे वारस समजले जात होते. परंतु 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यात बदल करण्यात आले त्यानंतर DD च मुलगा (DDS) आणि DD ची मुलगी (DDD) तसेच DS चा मुलगा (DSS) आणि DS ची मुलगी (DSD) असे चार प्रकारचे वारस वर्ग 1 मध्ये वाढवण्यात आले. अश्या प्रकारे वर्ग 1 मध्ये एकूण 16 प्रकारचे वारस समाविष्ठ होतात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *