मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
बर्याच कुटुंबांमद्धे असे पाहण्यात येते की वडीलोपार्जित जमीन ही ज्या-त्या वारसांच्या नावे झालेली नसते, सर्व वारसांचे नाव लावून ती जमीन सामाईक जमीन म्हणून वापरण्यात येते. आता जर सामाईक जमीनिमधील एका हिस्सेदाराला ती जमीन गहाण ठेवायची असेल तर ते शक्य आहे का? यासाठी इतर सह-हिस्सेदारांची ना-हरकत आवश्यक असते का? यासंबंधी सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.
सर्वप्रथम आपण एखादी मालमत्ता गहाण ठेवतो तेंव्हा नक्की काय होते हे समजून घेणे आवश्यक आहे. जेंव्हा आपण एखादी मालमत्ता एखाद्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे गहाण खत करून गहाण ठेवतो तेंव्हा त्या मालमत्तेचे जे काही मूल्य आहे त्याच्या काही टक्के रक्कम आपणास कर्ज म्हणून मिळतात.
गहाण खत केल्यामुळे ती वित्तीय संस्था कर्जाची परतफेड न झाल्यास त्या मालमत्तेची विक्री करून स्वतःचे पैसे परत मिळवू शकते. म्हणजेच, एखादी मालमत्ता गहाण ठेवून जेंव्हा कर्ज देण्यात येते तेंव्हा ती वित्तीय संस्था शेवटचा पर्याय म्हणून मालमत्तेच्या विक्रीकडे पाहत असते. आता जर एखाद्या मालमत्तेची विक्री करण्याची आवश्यकता पडली तर तेंव्हा सर्वात महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे ‘ त्या मालमत्तेचे टायटल क्लिअर असणे.’
जर समजा, एखादा 40 गुंठ्याचा तुकडा आहे आणि त्यामध्ये 4 हिस्सेदार आहेत. तर प्रत्येकाच्या हिस्स्यात 10 गुंठे इतके क्षेत्र येते हे सर्वांना माहीत असते. परंतु, जमिनीची वाटणी झालेली नसल्यामुळे कोणता तुकडा कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेले नसते. अश्या परिस्थितिमध्ये एखादा व्यक्ती आपल्या सामाईक जमीनिमधील आपला 10 गुंठे इतका हिस्सा जरी गहाण ठेवणार असेल तर पुढे जाऊन खूप सारे वाद निर्माण होऊ शकतात.
कारण, त्या व्यक्तीने 10 गुंठे हिस्स्याचे गहाण खत करून वित्तीय संस्थेकडून काही रक्कम कर्ज म्हणून घेतली आणि तो कर्जाची परतफेड करू शकला नाही तर ती वित्तीय संस्था एकूण 40 गुंठे क्षेत्र असलेल्या तुकड्यापैकी कोणत्या 10 गुंठे क्षेत्राची विक्री करेल हा प्रश्न निर्माण होतो. अश्या परिस्थितीमध्ये इतर 3 सह-हिस्सेदार विरोध करतील हे देखील सत्य आहे.
त्यामुळे, जर एखादी सामाईक जमीन गहाण ठेवायची असेल तर संपूर्ण तुकडाच गहाण ठेवणे आवश्यक असते. अश्या परिस्थितीमध्ये सर्व हिस्सेदारांना एकत्रित विचार करून एकत्रित निर्णय घेणे आवश्यक आहे. हे शक्य नसेल तर मात्र त्या सामाईक जमिनीची सरस नीरस मनाने वाटणी करून ज्याचे-त्याचे क्षेत्र निश्चित करून घ्यावे लागेल. त्यानंतरच त्या जमिनीचे गहाण खत करणे शक्य होईल.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.