मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आपण आपल्या अनेक आर्टिकल्समध्ये दिवाणी दाव्यासंबंधी सखोल माहिती सविस्तरपणे समजावून घेतलेली आहे, परंतु एखाद्या न्यायालयात फक्त दिवाणी दावेच चालतात असे नाही. न्यायालयामध्ये फौजदारी खटले देखील असतात. आजच्या या लेखात आपण एखाद्या फौजदारी खटल्याची कार्यपद्धती कशी असते? फौजदारी खटल्याची सुरुवात ते शेवट काय-काय होते हे सविस्तर जाणून घेऊ.
फौजदारी केसेस या फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये चालविल्या जातात. फौजदारी केस ही बेलेबल असो किंवा नॉन-बेलेबल असो, सर्व फौजदारी केसेसची कार्यपद्धती ही एकसारखीच असते. दिवाणी दाव्याप्रमाणे फौजदारी खटल्यांची कार्यपद्धती ही जास्त किचकट नसते, त्यामुळे बहुतांश प्रकरणे लवकर संपुष्टात येतात.
कोणत्याही फौजदारी खटल्याची पहिली स्टेज म्हणजे FIR. आता तुम्हाला FIR बद्दल थोडीफार माहिती असेलच, त्यामुळे आपण याबद्दल या लेखात सखोल माहिती न घेता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. FIR दाखल झाल्यानंतर पोलिस आरोपीला पकडून कोर्टसमोर हजर करतात. जर आरोपीने केलेला गुन्हा हा जामीनपात्र असेल तर आरोपीला जामीन दिला जातो. त्यानंतर तपास यंत्रानेद्वारे 90 दिवसांच्या आतमध्ये चार्जशीट कोर्टात दाखल केली जाते.
चार्जशीट हा कोणत्याही फौजदारी खटल्याचा खूप महत्वाचा भाग असतो. थोडक्यात आणि समजेल अश्या भाषेत सांगायचे झाले तर चार्जशीट मध्ये तपास यंत्रणेने त्या प्रकरणाचा केलेला संपूर्ण तपास नमूद केलेला असतो. यामध्ये FIR जोडलेले असते, आरोपी बद्दलची संपूर्ण माहिती असते, तपासात जप्त केलेल्या सर्व गोष्टींची माहिती असते.
तसेच पुढे फिर्यादीने पोलिसांना दिलेला जबाब, प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचा जबाब, डॉक्टरने दिलेले रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट्स अश्या सर्व प्रकारची माहिती चार्जशिटमध्ये नमूद असते. थोडक्यात काय तर, आरोपीने गुन्हा केला आहे हे कोर्टस पटवून देण्यासाठी ज्या-काही गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी चार्जशिटमध्ये नमूद केलेल्या असतात.
कोर्टात चार्जशिट दाखल केल्यानंतर त्याची एक प्रत आरोपीस विनामूल्य देण्यात येते. यानंतरची महत्वाची स्टेज असते ती म्हणजे चार्ज ठेवणे. पुढे आरोपींना हे चार्ज/आरोप मान्य आहेत किंवा नाही असे विचारण्यात येते. आरोपी याचे उत्तर हे आरोप मला मान्य नाहीत असेच देतात, त्यानंतर फौजदारी खटल्याची खरी प्रक्रिया सुरू होते.
पुढील स्टेज मध्ये सरकारी वकील यांच्याद्वारे चार्जशिट मधील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी, तपास अधिकारी तसेच इतरांना साक्षसमन्स काढले जाते. समन्स मध्ये नमूद असलेल्या तारखेला ज्या-त्या व्यक्तीला साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर राहावे लागते. सरकारी वकील हे त्या व्यक्तींचा सरतपास घेतात, ज्यामधे आरोपीने गुन्हा केला आहे, तो गुन्हा घडताना आम्ही पाहिला आहे वगैरे या गोष्टी कोर्टापुढे मांडण्याचा प्रयत्न सरकारी वकिलांकडून केला जातो.
पुढे, ज्या व्यक्तीचा सरतपास झालेला आहे त्यांचा बचाव पक्षाकडून ( आरोपीच्या वकिलांकडून ) उलटतपास घेण्यात येतो. उलटतपासादरम्यान बचाव पक्ष आरोपीने गुन्हा केलेला नाही हे साक्षीदारांकडून काढून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, उलटतपास ( म्हणजेच Cross Examination ) हा एक असा विषय आहे ज्याबद्दल एखादे पुस्तक लिहले तरी कमीच पडेल. त्यामुळे आपण या गोष्टींच्या खोलवर न जाता, फक्त कार्यपद्धती कशी असते हे समजण्याइतपत माहिती घेऊ.
सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपास झाल्यानंतर सरकारी वकील पुरावा संपला याबद्दलची पुरसीस कोर्टाला देतात. यानंतर फौजदारी खटल्यातील पुढील स्टेज असते ती म्हणजे CrPC चे 313 या कलमाची. यामध्ये आरोपीचे कथन रेकॉर्डवर नोंदविले जाते. यामध्ये जज साहेब आरोपींना काही प्रश्न विचारतात आणि आरोपी त्या प्रश्नांची उत्तरे देतात.
CrPC कलम 313 या स्टेजनंतर आरोपी यांना काही पुरावा द्यायचा आहे का याबद्दल विचारणा केली जाते. जर आरोपी पक्षाला वाटत असेल त्यांचे काही साक्षीदार कोर्टात सादर करावे तर त्यांना या स्टेजला संधी देण्यात येते. सरकारी वकील आरोपीच्या साक्षीदारांचा उलट तपास घेतात. आरोपीच्या बचावाचा पुरावा हा दोन धारी तलवारीप्रमाणे मानला जातो, कारण आरोपीच्या पुराव्यातून गुन्हा सिद्ध होण्याचा कधी कधी खूप मोठा धोका असतो.
यानंतर येते ती फौजदारी खटल्यातील शेवटची स्टेज, ती म्हणजे अंतिम युक्तिवाद. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील आपापला युक्तिवाद कोर्टसमोर मांडतात आणि शेवटी प्रकरण न्यायनिर्णायसाठी ठेवण्यात येते. तर ही झाली फौजदारी खटल्याच्या कार्यापद्धतीबद्दल अगदी साधी-सोपी आणि सरळ माहिती. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.