मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आपण एखाद्या मित्राला, एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला, आपल्या एखाद्या पाहुण्याला त्यांच्या गरजेच्या वेळी हातउसने पैसे देतो. त्या व्यक्तीची गरज भागल्यानंतर काही काळाने त्याने आपले पैसे परत देणे अपेक्षित असते, परंतु बरेच वेळा ती व्यक्ती याबद्दल टाळाटाळ करते. काही वेळा तर ‘मी पैसे देत नाही..’ इथपर्यंत प्रकरण जाते. मग अश्या परिस्थिती मध्ये आपण काय करावे? आजच्या या लेखात याबाबत कायदेशीर मार्गाने पैसे कसे परत मिळवायचे याबद्दल माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
मित्रांनो, आपण बरेच वेळा असे पाहिले असेल की एखादा व्यक्ती दुसर्या एखाद्या व्यक्तीला हातउसने पैसे देत असेल तेंव्हा त्या दुसर्या व्यक्तीकडून गॅरंटी म्हणून त्या रकमेचा चेक लिहून घेतो. इथे गोष्ट फक्त विश्वासाची नसते, तर कायद्याची देखील असते. कारण, गॅरंटी म्हणून घेतलेला चेक पुढे कोर्टात जाण्याची वेळ आली तर खूप उपयोगी पडतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला हातउसने पैसे देताना गॅरंटी म्हणून चेक घेणे कधीही आपल्या फायद्याचे ठरते.
चेक व्यतिरिक्त डिजिटल मार्गांनी पैसे पाठवलेले असतील तरीही पैसे पाठवल्याचा पुरावा आपल्याकडे राहतो. परंतु, जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला कॅश मध्ये हातउसने पैसे दिले, कॅश देताना चेक घेतलेला नसेल तर काय? अश्या परिस्थिती मध्ये आपण कोर्टात दाद मागू शकतो का? याचे उत्तर आहे हो..
एखाद्या व्यक्तीला हातउसने दिलेले पैसे तो परत करत नसेल तर पैशांच्या रिकव्हरीसाठी कोर्टात दावा दाखल करता येतो. सिव्हिल प्रोसीजर कोडच्या ऑर्डर 37 अंतर्गत हा दावा दाखल करता येतो. परंतु यासाठी ज्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचे याबाबतचे अॅडमिशन खूप महत्वाचे असते.
मित्रांनो, पैशांच्या रिकव्हरी साठी दावा दाखल करताना आपण त्या व्यक्तीला पैसे दिल्याचा काहीतरी पुरावा आपल्याकडे असणे आवश्यक आहे. अश्या वेळी दावा दाखल करताना ईमेल किंवा मेसेजचा वापर देखील पुरावा म्हणून करता येऊ शकतो. तुम्ही ज्या व्यक्तीला हातउसने पैसे दिले आहेत त्याला ईमेल किंवा मेसेज करा. या ईमेल मध्ये ”मी तुला या-या तारखेला, या-या कारणासाठी इतकी रक्कम दिली होती. तू ती रक्कम अजून परत केलेली नाही. मला सध्या पैशांची खूप आवश्यकता आहे, संपूर्ण नको पण थोडेफार तरी पाठव” अश्या आशयाचा मजकूर लिहू शकता.
तुम्ही त्या व्यक्तीला जेंव्हा असा मजकूर असलेला ईमेल किंवा मेसेज पाठवाल तेंव्हा त्यावर काही तरी उत्तर येईलच. ‘हो बघतो..’, ‘उद्या पाठवतो..’, ‘पुढच्या महिन्यात पाठवतो’ असा काही रीप्लाय येणे म्हणजे समोरील व्यक्तीने तुम्ही त्याला हातउसने पैसे दिल्याचे कबूल करणे असे झाले. आणि हा ईमेल किंवा मेसेज एक पुरावा होऊ शकतो.
पुढे, हा पुरावा घेऊन तुम्हाला एखाद्या हुशार वकील साहेबांना भेटावे लागेल. संपूर्ण प्रकरण त्यांना व्यवस्थित समजावून सांगावे लागेल. त्यानंतर वकील साहेब तुमच्यावतीने संबंधित दिवाणी न्यायालयात सिव्हिल प्रोसीजर कोडच्या ऑर्डर 37 अंतर्गत समरी सूट दाखल करतील. मित्रांनो हा समरी सूट इतर दिवाणी दाव्यांप्रमाणे 8-10 वर्ष चालणारा नसतो. समरी सूट लवकर संपतो आणि पैसे देखील परत मिळतात.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.