मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आपणास माहीत असेलच की कोर्टात दिवाणी दावे अनेक वर्ष चालतात, कित्येक वर्ष त्यामध्ये काहीच कार्यवाही होत नाही. कित्येक प्रकरणांमध्ये तर मूळ वादी-प्रतिवादीच्या पुढच्या पिढ्यांना देखील कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात. एखाद्या दिवाणी दाव्याच्या अश्या प्रकारे रेंगाळत राहण्यामागे अनेक कारणे आहेत.
आजच्या या लेखात आपण अशाच एका कारनाबद्दल जाणून घेणार आहोत. ते कारण म्हणजे समन्सची बजावणी. एखाद्या प्रकरणामद्धे वादीने दावा दाखल केल्यानंतर समन्सच्या बजावणीसाठीच 1-2 वर्ष लागत असतील तर पुढे तो दावा केंव्हा संपेल याचा विचार कारणे देखील अवघड आहे.
असे नाही की प्रत्येक दाव्यामद्धे समन्सच्या बजावणीसाठी वर्ष-वर्ष खर्ची जातात. काही प्रकरणांमध्ये 15-20 प्रतिवादी असतात, तरी देखील 1-2 महिन्यांमद्धे सर्व समन्सची बजावणी होऊन प्रतिवादी कोर्टात हजर होतात. तर काही प्रकरणांमध्ये एकच प्रतिवादी असतो जो समन्स स्वीकारण्यासाठी टाळाटाळ करतो.
कधी समन्सच्या रिपोर्ट मध्ये असे लिहून येते की प्रतिवादी दिलेल्या पत्त्यावर राहत नाही, कधी असे लिहून येते की प्रतिवादी बाहेर गावी रहण्यास गेला आहे, तर कधी एखादे नवीन लिहून समन्स परत येते. प्रत्येक वेळी वादीचे वकील साहेब नवीन समन्स बजावणीसाठी अर्ज करतात, पुन्हा तेच होते. अश्या वेळी 1-2 वर्ष प्रकरण समन्सच्या बजावणीसाठीच रेंगाळत राहते.
आता हे सर्व वाचून तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल, असे किती वेळा एखाद्या प्रतिवादीला नवीन समन्स पाठवत राहायचे? प्रतिवादीला समन्सची बजावणी होत नसेल तर यावर दूसरा काही मार्ग नाही का? तर यावर मार्ग आहे, एक नाही अनेक मार्ग आहेत आणि आजच्या या लेखात आपण त्यावरच माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
समन्स बजावणीची प्रक्रिया : वादी जेंव्हा एखादा दावा दाखल करतो तेंव्हा दाव्यामद्धे सर्व प्रतिवादींचे संपूर्ण पत्ते नमूद करणे आवश्यक आसते. याच पत्त्यांवर कोर्टातील बेलीफ मार्फत समन्सची बजावणी करण्यात येते. समजा दावा जर नागपुर मध्ये सुरू असेल आणि प्रतिवादी कोल्हापूर येथे राहत असेल तर प्रतिवादीचा कोल्हापूरचा संपूर्ण पत्ता नमूद करणे आवश्यक असते. साहजिकच नागपुरहून कोल्हापूरयेथे समन्सच्या बजावणीसाठी बराच वेळ लागू शकतो. नागपुर येथील कोर्टातून प्रतिवादी राहत असलेल्या ठिकाणच्या जवळील कोर्टात समन्स पाठवण्यात येते, प्रतिवादीच्या जवळील कोर्टातील बेलीफ ते समन्स प्रतिवादिस देत असतो.
परंतु बरेच वेळा असे देखील पाहण्यात येते की प्रतिवादी हा अतिहुशार असतो, तो बेलीफ सोबत हातमिळवणी करून चुकीचा रिपोर्ट पाठवण्यास सांगतो. आणि असा चुकीचा रिपोर्ट परत नागपुरच्या न्यायालयात आल्यानंतर साहजिक खूप सारा वेळ वाया जातो.
अश्यापरिस्थिती मध्ये वादी जवळ असलेला पहिला पर्याय म्हणजे कोर्टात RPAD द्वारे समन्स पाठवण्यासाठीचा अर्ज करणे. RPAD ही पोस्ट ऑफिसची एक सेवा आहे ज्यामधे प्रतीवादीपर्यंत समन्स पोहचण्याची शक्यता जास्त असते, तसेच त्यासाठी वेळ देखील कमी लागतो. RPAD म्हणजेच रजिस्टर्ड पोस्टद्वारे पाठवलेले समन्स वादी ऑनलाईन देखील तपासून पाहू शकतो.
परंतु प्रतिवादी चलाख असल्यास तो पोस्टमनला देखील हाताशी घेऊन ‘प्रतिवादीच्या घराला कुलूप आहे’, ‘प्रतिवादीचा पत्ता चुकीचा आहे’ असे कारण लिहून रजिस्टर्ड पोस्ट परत पाठवण्यास सांगतो. यासाठी पुढील पर्याय देखील वादीच्या कामाचा ठरू शकतो.
वादीकडे असलेला पुढचा कायदेशीर पर्याय म्हणजे ‘डकवून बजावणी’. यामध्ये समन्सची एक प्रत ही कोर्टातील नोटिस बोर्डवर लावण्यात येते तर दुसरी प्रत ही त्या प्रतिवादीच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर चिकटवण्यात येते. काही वेळेला कोर्टाच्या आदेशात असे देखील नमूद करण्यात येते की समन्सची एक प्रत प्रतिवादी राहत असलेल्या ग्रामपंचायतच्या नोटिस बोर्डवर देखील चिकटवण्यात यावी.
डकवून बजावणी व्यतिरिक्त दूसरा एक पर्याय बहुतेक वेळा वापरण्यात येतो तो म्हणजे प्रतिवादी राहत असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर समन्स छापून आणणे. परंतु यासाठी वादीला कोर्टस हे पटवून द्यावे लागते की प्रतिवादी समन्स घेण्यासाठी जाणून-बुजून टाळाटाळ करत आहे. या जाहीर समन्सचा खर्च हा वादीला द्यावा लागतो. हे वर्तमानपत्र दैनिक म्हणजेच दररोज प्रसिद्ध होणारे असावे.
जेंव्हा असे समन्स एखाद्या दैनिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केले जाते, तेंव्हा कोर्ट देखील हे समजून चालते की प्रतिवादी यास समन्सची कायदेशीर मार्गाने बजावणी झालेली आहे. वर्तमानपत्रामद्धे समन्स प्रसिद्ध झाल्यानंर देखील प्रतिवादी कोर्टात हजार झाला नाही, तर कोर्ट प्रतीवादीच्या विरुद्ध एकतर्फा कामकाज चालवण्याचे आदेश देऊन प्रकरण पुढे चालवण्यास सुरुवात करते.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.