एखाद्या व्यक्तीने विनामोबादला हक्कसोडपत्र करून दिले, तर नंतर त्या व्यक्तीस प्रॉपर्टीमध्ये हक्क मागता येतो का?

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

आपल्या पाहण्यात असे काही उदाहरणे आले असतील जिथे एखादी व्यक्ती विनामोबदला हक्कसोडपत्राने एखाद्या प्रॉपर्टीवरील आपला हक्क सोडून देते, परंतु काही काळानंतर ती व्यक्ती त्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागू लागते. काही प्रकरणात असे देखील पहण्यास मिळते की, विनामोबदला हक्कसोडपत्र करून देणारी व्यक्ती नंतर काही काळाने मोबदला मागू लागते.

अश्या वेळी कायदा नेमकं काय सांगतो? त्या व्यक्तिला नंतर त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळू शकतो का? त्या व्यक्तीने नंतर काही मोबदला मागितला असेल तर तो द्यावा लागेल का? हक्कसोडपत्राबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेल्या या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या कायदेविषयक लेखात जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि माहितीशीर वाटल्यास शेअर करा.

सर्वात प्रथम आपण हक्कसोड पत्र म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एकत्र कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने त्याच्या एकत्र कुटुंबातील मिळकती वरील त्याचा स्वतःचा वैयक्तिक हक्क ( जो वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीत आहे ) आपल्या एकत्र कुटुंबांमधील इतर सदस्याच्या नावे स्वेच्छेने आणि कायमस्वरूपी सोडून दिल्याबद्दल कागदोपत्री केलेला पुरावा. यालाच आपण हक्कसोड पत्र असं म्हणतो.

सामान्यत: हक्कसोडपत्र दोन पद्धतींनी केला जातो, एक म्हणजे मोबदला घेऊन किंवा दूसरा म्हणजे विनामोबदला. येथे मोबदला अनेक स्वरूपाचा असू शकतो, जसे की पैसे घेऊन केलेले हक्कसोडपत्र. हक्कसोडपत्राच्या दस्तामद्धे या गोष्टी नमूद करणे फायद्याचे ठरते.

आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळू, एखाद्या व्यक्तीने विनामोबादला हक्कसोडपत्र करून दिले, तर नंतर त्या व्यक्तीस प्रॉपर्टीमध्ये हक्क मागता येतो का? हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा, तुमच्या आजोबांचा नावावरील प्रॉपर्टी वारसहक्काने तुमच्या वडिलांना आणि आत्याला मिळाली. तुमच्या वडिलांचे आणि आत्याचे नाते घट्ट असल्याने आत्याने विनामोबदला हक्कसोडपत्र करून प्रॉपर्टी तुमच्या वडिलांच्या नावे कायमस्वरूपी सोडून दिली.

परंतु, पुढे काही काळानंतर आत्या आणि वडिलांच्या नात्यात कडवटपणा आला. तेंव्हा आत्या पुन्हा त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू लागली. तर अश्या परिस्थितीत आत्याला प्रॉपर्टीमध्ये पुन्हा हिस्सा मिळू शकतो का?

याचे उत्तर एका वाक्यात देता येईल एवढे सोपे नाही. यासाठी आपल्याला प्रथम हे पहावे लागेल की ज्या हक्कसोडपत्राने आत्याने प्रॉपर्टी वरील आपला हक्क सोडून दिला होता ते रजिस्टर्ड होते का? त्या रजिस्टर्ड हक्कसोड पत्राचा फेरफार घेऊन 7/12 सदरातील आत्याचे नाव कमी करण्यात आले होते का?

या दोन्ही प्रश्नांची उत्तरे जर ‘हो’ असे असतील तर, तुम्हाला घाबरण्याची जास्त काही आवश्यकता नाही. कोणताही रजिस्टर्ड दस्त रद्द करण्यासाठी कायद्याने एक मुदत घालून दिलेली आहे, ती मुदत 3 वर्षांची आहे.

कोणत्याही रजिस्टर्ड दस्ताने झालेला करार रद्द करण्यासाठी कोर्टाची पायरी चढणे आवश्यक होते. आपण पाहत असलेल्या उदाहरणात आत्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे दिवाणी न्यायालयातून रजिस्टर्ड हक्कसोडपत्र रद्द करून घेणे. त्यासाठी आत्याला किंवा तिच्या वारसांना दिवाणी दावा दाखल करावा लागतो. तुमच्या महितीस्तव सांगतो की, कोणताही रजिस्टर्ड दस्त कोर्टाकडून रद्द करून घेणे ही सोपी बाब नाही.

या प्रकरणात कोर्टाकडून बरेच मुद्दे लक्षात घेतले जातात. जसे की, हक्कसोडपत्र बनवून घेताना काही गोष्टी लपवण्यात आल्या होत्या का? हक्कसोडपत्र दबावाखाली करून घेतले होते का? हक्कसोडपत्र करून दिल्यानंतर कोर्टासमोर येण्यास लागलेला वेळ देखील पाहण्यात येतो. आपल्या उदाहरनाबद्दल बोलायचे झाले तर, आत्याला किंवा तिच्या वारसांना कोर्टाच्या या मुद्द्यांचे समाधान करावे लागेल, जी वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही.

तर मग एखाद्या व्यक्तीने विनामोबादला हक्कसोडपत्र करून दिले, तर नंतर त्या व्यक्तीस प्रॉपर्टीमध्ये हक्क मागता येतो का? याचे उत्तर ‘हो’ जरी असले तरी त्या व्यक्तीला नंतर त्या प्रॉपर्टी मध्ये हक्क मिळेल याची शक्यता खूप कमी असते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *