नोंदणीकृत बक्षीस पत्र किंवा खरेदी खत रद्द करता येते का? जाणून घ्या यासाठी कायदेशीर पर्याय कोणता?

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

आपण बक्षीस पत्र किंवा खरेदी खत करून घेतो, त्या दस्ताची रीतसर नोंदणी करून घेतो. अश्या पद्धतीने एखाद्या प्रॉपर्टीचे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरण केले जाते, परंतु काही वेळा भविष्यात अशी परिस्थिति येते की आपणास ते खरेदी खत किंवा बक्षीस पत्र रद्द करून घेणे गरजेचे वाटू लागते. परंतु बहुतेक सरकारी कार्यालयामध्ये ” नोंदणीकृत दस्त रद्द करणे शक्य नाही ” असे उत्तर आपणास मिळते.

खरंच नोंदणीकृत बक्षीस पत्र किंवा खरेदी दस्त रद्द करणे शक्य नाही का? जर शक्य नसेल तर त्याचे काय कारण आहे? जर शक्य असेल तर त्यासाठी काय करावे लागेल? आजच्या या कायदेशीर लेखामद्धे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो, साठे करार, लीज करार, इत्यादी असे काही करार आहेत ज्यामधे एखाद्या प्रॉपर्टीच्या मालकीचे हस्तांतरण होत नाही. त्यामुळे असे नोंदणीकृत करार आपणास जेंव्हा रद्द करण्याची आवश्यकता भासते तेंव्हा डिड ऑफ कॅन्सलेशनद्वारे हे करार रद्द करता येतात. परंतु, बक्षीस पत्र किंवा खरेदी खत हे असे करार आहेत ज्यामध्ये या दस्ताची नोंदणी होताच मालकीचे हस्तांतरण होत असते.

नोंदणीकृत बक्षीस पत्र किंवा खरेदी खत यांच्याद्वारे मालकी हक्कांचे हस्तांतरण होते, या कारणाने हे करार डिड ऑफ कॅन्सलेशनद्वारे रद्द करता येत नाहीत. मग आता तुम्ही म्हणाल यावर पर्याय काय आहे? तर, बक्षीस पत्र, खरेदी खत किंवा असे कोणतेही नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचा अधिकार हा दिवाणी न्यायाधीश यांनाच आहे. त्यामुळे, नोंदणीकृत बक्षीस पत्र किंवा खरेदी खत रद्द करून हवे असेल तर त्या संबंधीचा दावा सक्षम दिवाणी न्यायालयात दाखल करणे हा एकमेव पर्याय आहे.

बक्षीस पत्राबद्द्ल बोलायचे झाले तर, सामान्यतः गिफ्ट व्यवहार पूर्ण झाला की तो Revoke किंवा रद्द करता येत नाही. मात्र याला काही अपवाद कायद्यात नमूद करण्यात आले आहेत. जर दान करण्यासाठी दबाव टाकून जबरदस्तीने किंवा डोनरची दिशाभूल करून त्याची संमती मिळवली असेल तर असं बक्षीस पत्र रद्द करून घेण्याचा पर्याय डोनर कडे असतो. केवळ डोनरचा विचार बदलला म्हणून बक्षीसपत्र रद्द करता येऊ शकत नाही. सक्षम न्यायालयात या गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी ही वादीची असते.

खरेदी खत याबद्दल बोलायचे झाले तर, खरेदी खत दबाव टाकून केलेले असेल, दिशाभूल केलेले असेल, खरेदी देणार्‍याची मानसिक स्थिती योग्य नसेल तर कोर्टात पुराव्यानिशी हे सिद्ध करून खरेदी खत रद्द करून घ्यावे लागते. यासंबंधी आपण आपली केस ही चांगल्या वकील साहेबांना देणे खूप आवश्यक असते, कारण कोर्टामद्धे अश्या गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध करणे ही सोपी बाब नाही.

मित्रांनो, नोंदणीकृत बक्षीस पत्र किंवा खरेदी दस्त रद्द करण्याचा कायदेशीर पर्याय कोणता हे आज आपण या लेखाद्वारे समजून घेतले. हा पर्याय वाटतो तितका सोपा नाही, तसेच यासाठी खर्ची जाणारा पैसा आणि वेळ देखील खूप जास्त आहे. त्यामुळे जेंव्हा-केंव्हा आपण एखाद्या दस्ताची नोंदणी करतो तेंव्हा सर्व गोष्टींचा विचार करणे, वकिलांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे ठरते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *