25 लाखांमद्धे झालेला व्यवहार खरेदी दस्तावर 15 लाखांचा दाखवला तर? जाणून घ्या तुमच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर.

Infomative

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

आपल्या इन्फो इन मराठी वेबसाईट वरील कायदे विषयक लेख बर्‍याच लोकांना उपयोगी पडतात. त्यातच बरेच लोक कमेंट मध्ये किंवा मेसेज करून आपले प्रश्न आम्हास विचारतात. त्यापैकीच बर्‍याच लोकांनी विचारलेला एक प्रश्न म्हणजे ‘खरेदी खतावर वेगळी रक्कम आणि हस्तांतरीत केलेली रक्कम वेगळी असेल तर चालेल का?’ हा आहे, त्यामुळे त्याबद्दल हा सविस्तर लेख. हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर करा.

आपण असे बरेच करार पाहिले असतील ज्यांची खरेदी दस्त वर लिहिलेली किंमत आणि ठरलेली किंमत या दोन्ही मध्ये तफावत असते. ठरलेली किंमत 25 लाख रुपये होती व स्टॅम्प ड्युटी वाचवण्‍यासाठी दस्तावर लिहिलेली किंमत 15 लाख रुपये होती, असे व्यवहार आपल्या पाहण्यात आले असतीलच. असे करार करणारे लोक पुढे वकील साहेबांना भेटून सांगतात, ”आता आमचा व्यवहार रद्द करावयाचा आहे, तर आम्हाला 25 लाख रुपये परत मिळतील का?”

आजची ही परिस्थिती फारच गंभीर होत चाललेली आहे. स्टॅम्प ड्युटी वाचवण्‍यासाठी खरेदी दस्तावर ठरलेल्या किमती पेक्षा कमी किंमत लिहिणे ही मानसिकता देखील खूप चुकीची आहे. यामुळे कोणकोणत्या प्रकारचे नुकसान आपल्याला भविष्यात सहन करावे लागतील ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊ.

हा मुद्दा समजून घेण्या अगोदर एक उदाहरण घेऊया जेणेकरून हा मुद्दा आपणास प्रॅक्टिकली समजून घेता येईल. यामुळे तुमच्या मनात काही शंका निर्माण होणार नाही. समजून चालू की रमेश विक्रेता आहे आणि सुरेश जमीन खरेदी घेणारा आहे. दोघांमध्ये व्यवहार 25 लाख रुपयांमध्ये ठरला. त्याप्रमाणे 10 लाख रुपये सुरेश ने रमेशला Advance म्हणून दिले. उर्वरित 15 लाख रुपये खरेदी दस्ताची नोंदणी झाल्यावर देण्याचे ठरले. त्याच प्रमाणे खरेदी दस्तावर 15 लाख रुपये किंमत लिहिण्याचे ठरले जेणेकरून स्टॅम्प ड्युटी वाचेल.

ठरल्या प्रमाणे हा खरेदी दस्त नोंदणीकृत देखील झाला. परंतु काही कालावधीनंतर सुरेशला झालेला खरेदीखताचा व्यवहार रद्द करायचा असल्याने तो वकील साहेबांना भेटला. वकील साहेबांनी सदर खरेदी दस्त वाचल्यानंतर सल्ला दिला की सदर व्यवहार कागदोपत्री 15 लाख रुपयांचा असल्याने तुम्हाला दिवाणी न्यायालयात 15 लाख रुपयांचा क्लेम करता येईल. म्हणजे काही हजार रुपयांची स्टॅम्प ड्यूटी वाचवण्यासाठी दस्तावर नमूद केलेल्या चुकीच्या रकमेमुळे सुरेशला आता 10 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

हे तर झाले उदाहरणांमधून समजावून घेणे. याचाच जर खर्‍या आयुष्यामध्ये विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आजच्या युगामध्ये प्रॉपर्टीचे दर अगदी कोट्यावधी पर्यंत पोचलेले आहेत. परंतु मानवी स्वभावाचे एक वैशिष्ट्य असे आहे की जेवढे पैसे कमवता आणि वाचवता येतील तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. निश्चितच एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार करत असताना ठरलेली किंमत लपवली जाणे हे काही नवीन नाही. या एका गोष्टी मुळे काय काय नुकसान होते किंवा भविष्यात काय काय नुकसान होऊ शकते ते आपण थोडक्यात पाहूया.

अगोदर सांगितलेल्या उदाहरणामध्ये झालेला व्यवहार रद्द करून घ्यायचा असेल तर तो व्यवहार किंवा जेवढी रक्कम तुमच्या दस्तवर नमूद आहे तेवढ्याच रकमेचा तुम्ही वसुलीचा दावा करू शकता. त्यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला कदापि मागता येणार नाही. दुसरा एक महत्त्वाचा तोटा म्हणजे तुम्ही जर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर बॅलन्स शीटमध्ये ठरलेल्या किमतीच्या वर नमूद असलेली रक्कम तुम्हाला दाखवता येणार नाही. कारण ठरलेल्या किमतीच्या वरची रक्कम तुम्ही जमीन मालकाला दिलेली असेल ती किंमत तुम्ही ब्लॅक मध्ये म्हणजेच बेकायदेशीर किंवा अनधिकृतरित्या दिलेली असते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी एखादी 25 लाखांची प्रॉपर्टी आपण कागदोपत्री 15 लाख रुपयांमध्ये घेतली आणि ती प्रॉपर्टी आपण विक्रीस काढली तर दस्तावर नमूद असलेल्या 15 लाख या रकमेमुळे प्रॉपर्टीचा भाव कोसळेल. तसेच तुम्ही 25 लाख रुपयांना प्रॉपर्टी घेतली असे सांगत असाल तर तुम्ही खोटे बोलत आहात हे त्याच्या मनामध्ये पक्के होईल. त्यामुळे सौदा फिसकटेल. आणखीन काही व्यक्ती असा देखील प्रश्न विचारतात की 15 लाख रुपये दिले आणि उर्वरित दहा लाख रुपये देण्याची नोटरी करून घेतली तर चालेल का? असे चालणार नाही कारण जर तुम्ही नोटरी मध्ये असा उल्लेख केला की व्यवहार 25 लाखांचा ठरलेला होता परंतु स्टॅम्प ड्युटी कमी भरण्यासाठी आम्ही 15 लाख रुपये अशी कमी किंमत दाखवली आहे. तर मुळातच तुम्ही सरकारचा महसूल बुडवत असल्याने तुमच्या विरुद्ध त्या नोटरीच्या आधारे गुन्हा दाखल होऊ शकतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *