२०१७-१८ चा काळ, कडकनाथ कोंबडीचे चिकन आणि अंडी त्यांच्या औषधी गुणामुळे खूप प्रसिद्ध झाले होते. म्हणजे बीपी, डायबेटीस वाल्या माणसांसाठी त्या कोंबडीचं मास आणि अंडी खूप गुणकारी असं म्हटलं जायचं. त्यामुळे त्याची किंमत पण महाग होती. ६० रू ला एक अंड आणि ५०० रुपयेला एक कोंबडी. त्यातला पैसा बघून आपल्या माणसांनी त्या कडकनाथ कोंबडीच्या कुकुटपालन बिजनेस मध्ये उतरायचं ठरवलं आणि तिथेच ते फसले.
कारण पुढे त्या बिझनेस मध्ये त्यांच्यावर एवढा मोठा फ्रॉड झाला की आजतागायत ते त्यातून बाहेर येऊ शकले नाहीत. बर फक्त तेच नाहीत तर त्या कडकनाथ घोटाळ्यामुळे तेव्हा चक्कर राज्य सरकार सुद्धा चिंतेत पडलं होतं. आता तो घोटाळा नेमका काय होता? आणि कुणी घडवून आणला होता? तेच आपण आज जाणून घेणार आहोत.
खरंतर 2016 पासून कडकनाथ कोंबडीच्या कुक्कुटपालन व्यवसायाची देशभरात पेरणी करण्यात आली होती. म्हणजे आरोग्याला त्या कोंबडीचं काळ चिकन आणि काळी अंडी खूप उपयुक्त आहेत आणि त्या अंड्यांना परदेशात जास्त मागणी असते असं तिचं मार्केटिंग करण्यात आलं होतं. बर फक्त मार्केटिंगच नाही तर त्या कोंबडी पालन व्यवसायात लाखोंचा नफा देखील कमावता येतो असाही प्रचार महाराष्ट्राच्या गावागावात करण्यात आला होता. सांगली सातारा आणि कोल्हापूर भागात तर त्या कडकनाथ कोंबडीला चक्क सोन्याची कोंबडी म्हटलं जायचं.
औषधी गुणधर्माच्या पाट्या लावून कित्येक हॉटेल व्यवसाय तेव्हा स्पेशल कडकनाथ कोंबडीचा चिकन लोकांना खाऊ घालायचे. अगदी यूट्यूब पासून मेन स्ट्रिम मधल्या न्यूज मीडियाचा वापर करून कडकनाथ कोंबडी पळणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा गळा फाडून सांगितल्या जायच्या. अमुक तमुक गावच्या शेतकऱ्यांने कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायातून कमावले पंधरा लाख रुपये. अशा स्वरूपाच्या बातम्या दर दोन दिवसा आड टीव्हीला दिसायच्या. गुजरात सरकारने त्या काळात गरीब कुटुंबात जिथे कुपोषित बालक आहेत तिथे कडकनाथ कोंबड्यांची पिल्ल वाटण्याची योजना अमलात आणली होती. इतकं त्यावेळी देशात आयुर्वेदिक अशा कडकनाथ कोंबडीचा बोलबाला झाला होता.
तोच बोलबाला ऐकून सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून कडकनाथ कोंबड्या पाळण्याचा निर्णय घेतला होता. घरची शेती सांभाळत गावातच राहून लाखो रुपये छापून देणारा तो धंदा तेव्हा लोकांना जाम आवडला होता. त्याच गावोगावी होणाऱ्या माउथ पब्लिसिटीमुळे तर आणखीनच कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायाला बरकत आली होती. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखे बरेच भोळे बापरे शेतकरी त्या धांद्यातल्या पैशाला बघून भुलले होते.
त्यांनी लाखोंची गुंतवणूक केली होती पण शेवटी त्यांच्या हातात मिळाला आत्महत्येचा पर्याय. कारण तो एक खूप मोठा चेन मार्केटिंगचा बिझनेस होता. आता चेन मार्केटिंग म्हणजे काय हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच असेल. त्यांना माहित नाही त्यांच्या साठी थोडक्यात महिती- चेन मार्केटिंग मध्ये कंपनी आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी काही लोकांना कामाला ठेवते. ते लोक साखळी पद्धतीने मार्केटिंग आणि सेलिंगची काम करतात.
म्हणजे एकाने दोन माणसं जोडायची त्या दोघांनी पुढे आठ माणसे जोडायची, असा सगळा प्रकार असतो. त्यालाच नेटवर्क मार्केटिंग असं म्हणतात. कंपनीसोबत जोडणाऱ्या लोकांना मग बंगला, गाडी, फॅमिली सोबत फॉरेन ट्रिप अशी मोठी स्वप्न दाखवली जातात. त्यांच्या इमोशनचा फायदा करून प्रॉडक्ट विक्रीच्या नावाखाली त्यांच्यामार्फत कंपनीत गुंतवणूक करून घेतली जाते, कंपनीतून मोठे रिटर्न्स माघारी भेटतील म्हणून.
पण सरते शेवटी फक्त कंपनीच्या मेन मालकालाच गच्च पैसा भेटतो आणि तो पैसा हातात आला की मालक सरळ फॉरेनला पळून जातो. मग त्याच्या हाताखाली चेन मध्ये जे पण लोक काम करत असतात त्यांना दोन्ही हाताने ठो ठो बोंबलत बसल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही.
कडकनाथ कोंबडीच्या बिसनेस मागे पण हे चेन मार्केटिंगचे मॉडेल होतं. पण शेतकऱ्यांना ते कळायला चार वर्षे उलटावे लागले.
आता आपण कडकनाथ घोटाळा नेमका काय होता ते जाणून घेऊया. सांगलीच्या इस्लामपूर तालुक्यात जेव्हा महा रयत अग्रो नावाची कंपनी अस्तित्वात होते, तिचे मुख्य कॉर्पोरेट ऑफिस पुण्यात होतं. त्या कंपनीने एक नवीन स्कीम त्याकाळी पश्चिम महाराष्ट्रात राबवली होती. ती स्कीम होती कडकनाथ कोंबडी पालनाची. ती स्कीम अशी होती की शेतकऱ्याला लाख रुपयापासून अडीच लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून कंपनीमार्फत कडकनाथ पक्षी दिला जाईल. त्या अडीच लाख रुपयांच्या गुंतवणूक वर सात लाख रुपयांचा नफा मिळेल असा कंपनी शेतकऱ्यांना पटवून द्यायची.
कोंबडीचे खाद्य, लस हे सगळं कंपनी पुरवणार आणि ठराविक काळानंतर कोंबडीची अंडी आणि कोंबडी सुद्धा कंपनीत विकत घेणार, असाही कंपनी करार करून द्यायची. वर्षभरात गुंतवणुकीच्या टोटल 300% फायदा शेतकऱ्यांना मिळेल असं देखील छातीठोकपणे कंपनीचे कर्मचारी सांगायचे. त्यांच्या त्या अमिषाला सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा ठिकाणच्या शेतकरी, शेतमजूर आणि तरुण मुलं देखील बळी पडली. त्यांच्या पैकी कित्येकांनी आपले सोन तारण ठेवून, जमीन गहाण ठेवून, नातेवाईकांच्या पाया पडून पैसे गोळा केले.
तार कंपाउड करून शेड उभी केली. पोल्ट्री व्यवसयात लागते ती सगळी सामग्री लाख लाख रुपये खर्चून विकत घेतली. त्याच्या पैकी अगदीच उदाहरण सांगायची झालीच तर सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी चे चंद्रकांत खोत यांनी ऊस शेतीतून मिळालेली पाच लाख रुपयांची रक्कम कडकनाथ कोंबडी व्यवसायात घातली. कानेगावच्या ओंकार पवारने तर बापाला नऊ लाख रुपये त्या बिजनेस मध्ये गुंतवायला सांगितले. तसेच भाऊची गावचे विलास रामचंद्र यादव यांनी देखील आपल्या आर्मीतल्या लेकाला सांगून कडकनाथचा पोल्ट्री फार्म उभारला.
ही किमान मध्यम वर्गीय घरातली उदाहरण आहेत. पण पारधी समाजाचे अंकुश काळे यांनी तर स्वतःच्या मालकीची इंचभर जमीन नसताना आपल्या नातेवाईकांकडून पैसे गोळा केले आणि संसाराला हातभार म्हणून कडकनाथ पक्षी घरी आणले. पण त्या सगळ्या मंडळींना त्या व्यवसायातून एक फुटकी दमडी देखील मिळाली नाही. बाकीच्यांनी कसे का होईना आपल्या संसाराचे रहाटगाडे पुढे नेले. पण आधीच गावाने टाकलेल्या अंकुश काळेना मात्र आपल्या घरची चूल पेटावी म्हणून अक्षरशा दारो दारी जाऊन लोकांना धान्य मागावं लागलं.
कधीकधी गावकरी तोंडावर दार बंद करून घ्यायचे पण 70 वर्षाचे अंकुश नाना आपल्या चार वर्षाच्या नातवाच्या तोंडाकडे बघून पुन्हा दुसऱ्याच्या दारात जाऊन उभे राहायचे. आता त्या घटनेला चार-पाच वर्षे उलटून गेली असली तरी आज सुद्धा त्यांच्या डोळ्यातलं पाणी आटलेलं नाही. अंकुश नानांसारखेच तब्बल साडेआठ हजार शेतकरी त्या सहाशे कोटींच्या कडकनाथ घोटाळ्याचे बळी ठरले होते. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी कंपनीत जाऊन त्यासंबंधी कर्मचाऱ्यांची भेट घेतली तेव्हा पुढच्या महिन्यात पेमेंट देतो असं म्हणून महा रयत ऍग्रो कंपनीने टोलवाटोलवी करायला सुरुवात केली होती. कंपनीने सरळ सरळ हात वर केल्यामुळे खचलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्याच्या घटना घडल्या असं तिथले स्थानिक शेतकरी आजही सांगतात.
पण पोलीस दरबारी मात्र तशा केसेसची नोंद झाली नाही. पुढे त्या कडकनाथ घोटाळ्या मध्ये भरडलेल्या अनेक लोकांनी मिळून एक शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली आणि आपली नुकसान भरपाई मिळावी यासाठी 2018 साली मंत्रालयापर्यंत मोर्चे काढले. दिग्विजय पाटील हे त्या समितीचे अध्यक्ष होते. पण 2019 ची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून प्रचारात गुंग झालेल्या तत्कालीन सरकारला मात्र त्या शेतकऱ्यांची दया आली नाही. त्यामुळे आज देखील ते शेतकरी आपल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
त्यावेळचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर त्या घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यावेळी ते रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष होते. घोटाळा करणार्या कंपनीचं नाव आणि त्यांच्या संघटनेचे नाव मिळत जुळत होतं म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. पण त्यांनी मात्र माझा त्या कंपनीशी काही संबंध नाही किंवा माझी त्यात कोणती वैयक्तिक भागीदार नाही, असं माध्यमांना सांगितलं होतं. आता त्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे याचाही बराच शोध त्यावेळी घेण्यात आला होता. सांगलीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंग हे त्या वेळी कसुन त्या घोटाळ्याचा शोध घेत होते.
त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त महाराष्ट्रच नाही तर त्यात टोटल सात राज्यात कडकनाथ व्यवसायावर देशोधडीला लागलेले शेतकरी पाहायला मिळत होते. त्या व्यवसायाने राज्याच्या गावागावात आपली पारमुळ पसरली होती आणि हे फक्त एका व्यवसायापुरतं मर्यादित प्रकरण नव्हतं. लोकांना भरमसाठ पैशाची आमिष दाखवून त्यांना लूटणारी ही टोळी फार आधीपासून अस्तित्वात होती. दर वेळी ती नवनवीन कल्पना आणि प्रॉडक्ट शोधून काढत लोकांना गंडा घालण्याचं काम करत होती. इमू, शहामृग, ससे पालन हे सुद्धा त्याच चेन बिजनेसचे प्रकार होते ज्यात असंख्य लोकांनी आपली आयुष्यभराची कमाई वाया घालवलेली.
एवढं सगळं महाभारत घडूनही लोक अजून तशा प्रलोभनांना बळी पडतात हे बघून फार वाईट वाटतं. कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणी त्या वेळेपर्यंत जवळपास 1100 जणांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिली होत्या. त्यावेळी हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महा रयत आग्रो कंपनी चा संस्थापक सुधीर मोहितेसह सहा जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी संदीप मोहिते, हनुमंत जगदाळे, गणेश शेवाळे यांना आधीच अटक करण्यात आली होती.
मात्र सुधीर काही पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पुढे 2019 साली सुधीर मोहिते हा न्यायालयाला शरण आला तेव्हा पोलिसांनी त्यालाही अटक केली. सध्या त्या प्रकरणातल्या संपूर्ण आर्थिक घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत. तर मंडळी एवढं सगळं महाभारत एकट्या कडकनाथ कोंबडीने घडवल होत.
आज सुद्धा देशात अशा प्रकारे एमएलएम नेटवर्क मार्केटिंग सारखे ट्रिक वापरून उच्च करिअरची स्वप्न दाखवून सर्रास तरुणांना लुटल जातं आणि तरुण सुद्धा लाखो रुपयांच्या अकड्याकडे बघून त्यात गुरफटत जातात, ते आत शिरतात मात्र अज्ञानामुळे पुढे त्यांना ते चक्राव्यू लवकर भेदता येत नाही. आणि त्यातच त्यांच्या आयुष्याच खेळण होत. तरुणांनी वेळीच यातून बाहेर पडून फटक्यात श्रीमंत होण्याची स्वप्न न बघता आधी स्वतःला प्रिपेअर करणे गरजेचे आहे.