8 जून हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत निराशाजनक होता. कारण, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता क्रिकेटप्रेमींना मिताली क्रिकेट स्टेडियममध्ये शानदार षटकार आणि चौकार मारताना दिसणार नाही. तिला भारतीय महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर देखील म्हटले जाते.
ती एकमेव महिला खेळाडू आहे जिने असे अनेक विक्रम केले आहेत, जे भविष्यातील क्रिकेटपटूंना तोडणे खूप कठीण असेल. मितालीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोनदा विश्वचषकापर्यंतचा प्रवासही केला आहे.
मितालीची चमकदार खेळी आणि तिच्या क्रिकेट कारकिर्दीतील कामगिरीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का , ज्या खेळात तिने आपलं नाव इतकं उंचावलं आहे, त्या खेळात तिला करिअर करायचंही नव्हतं? होय, आज आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात मितालीची एन्ट्री कशी झाली ते सांगणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा.
लहानपणी होती खूप आळशी :
मिताली 8 वर्षांची असताना ती खूप आळशी होती. त्या काळात झोप हे तिचे पहिले प्रेम होते असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण वडिलांना तिची ती सवय अजिबात आवडत नसे. मितालीचा मोठा भाऊ देखील क्रिकेटर आहे. जेव्हा तिचा मोठा भाऊ क्रिकेट कोचिंग घेत होता तेव्हा मितालीचे वडील मितालीला जबरदस्तीने क्रिकेटच्या मैदानात खेळायला पाठवत असत. यामुळे मिताली सिकंदराबाद येथील सेंट जॉन क्रिकेट अकादमीमध्ये जाऊन तिचा शाळेतील गृहपाठ पूर्ण करत असे.
टाईमपास म्हणून केली क्रिकेटची सुरुवात :
मितालीला लहानपणापासूनच भरतनाट्यमची आवड होती. त्यामुळे शाळेचा अभ्यास झाल्यावर मितालीला सेंट जॉन क्रिकेट अकादमीमध्ये खूप कंटाळा यायचा. त्यानंतर ती बॅट हातात घेऊन टाइमपास म्हणून प्रॅक्टीस करत असे. ज्योती प्रसादने ( मितालीची कोच ) तिच्या फलंदाजीची शैली, वेगवान हालचाली आणि चेंडू मारण्याची तिची अनोखी पद्धत लक्षात घेतली, त्यानंतर तिला वाटले की या मुलीमध्ये काहीतरी आश्चर्यकारक करण्याची शक्ती आहे.
क्रिकेट सोबतच डान्सची देखील ट्रेनिंग :
1992 मध्ये मिताली राज हैदराबादच्या सेंट जॉन स्कूलच्या कोचिंग कॅम्पमध्ये होती. त्यादरम्यान ज्योती प्रसाद यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि पहिल्यांदा नेटमध्ये गोलंदाजी करत होते. त्यांच्यासमोर मिताली राज होती, जी ज्योतीसारख्या दिग्गज क्रिकेटपटूचे चेंडू खेळत होती. त्यादरम्यान ज्योती प्रसाद यांना समजले होते की या मुलीचे क्रिकेटमध्ये खूप उज्ज्वल भविष्य आहे. त्यांनी मितालीला नियमित क्रिकेट प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला. मिताली राजच्या वडिलांना देखील हे हवे होते.
मिताली क्रिकेटच्या प्रशिक्षणादरम्यान नृत्याचा सराव करत असे. मात्र दोन्ही क्षेत्रांचा प्रभाव पाहता वडिलांनी तिला क्रिकेट निवडण्यास सांगितले.
मितालीने एकदा तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते, “माझे प्रशिक्षक एक कठीण टास्कमास्टर होते. रात्रीच्या वेळी ते एकामागून एक फेऱ्या मारायचे. सोबतच मी सूर्योदयापूर्वी मैदानावर पोहोचावे अशी त्यांची इच्छा होती. तुम्ही तयार असले पाहिजे अशी त्यांची कल्पना होती. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा फलंदाजी करा. गोलंदाज आले की तुम्ही लगेच फलंदाजी करू शकता आणि नेटमध्ये अतिरिक्त वेळ मिळवू शकता. मी सलग दोन तास सराव करायचे. सरावानंतर मी माझा नाश्ता मैदानातच करायचे. शाळा संपल्यानंतरही मिताली प्रशिक्षक संपत कुमार यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत असे.
पहिल्या अंतरराष्ट्रीय सामन्यातच बनली ‘हीरो’ :
आपल्या कौशल्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्थान निर्माण केल्यानंतर, मितालीने वयाच्या 14 व्या वर्षी 1997 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या संभाव्य खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. मात्र, तिला अंतिम संघात स्थान मिळवता आले नाही.
1997 च्या विश्वचषकानंतर जे घडले ते एक वर्ष महिला क्रिकेट साठी कठीण काळ होता. कित्येक खेळाडू पैशा अभावी आणि प्रतिभेच्या गंभीर अभावामुळे बाहेर पडले. या सगळ्याच्या मधे आली ती अतिशय हुशार मिताली राज.
1999 मध्ये आयर्लंडविरुद्ध सामना खेळून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे जे घडले ते निश्चितच एक वादळ होते ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. मितालीने या सामन्यात नाबाद 114 धावा केल्या आणि सर्वांना तिच्या प्रतिभेचा ट्रेलर दाखवला. त्यानंतर मितालीने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने असे अनेक विक्रम आपल्या नावावर केले, जे मोडणे अवघड नाही तर अशक्य आहेत.
मिताली राजची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे तिने केलेल्या धावा नाहीत तर तिची केवळ उपस्थिती संघात संयम आणि स्थिरता वाढवते. यामुळेच निवृत्तीनंतर क्रिकेटच्या मैदानात तिची नेहमीच उणीव भासेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.