नोंदणीकृत मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरू शकते का? जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर समजेल अश्या भाषेत.

Infomative News

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

स्थावर मालमत्ता ( जसे की शेत जमीन, खुला प्लॉट, घर, इत्यादी ) याबद्दलचे वाद हे आपल्यासाठी काही नवीन नाहीत. आपण आपल्या घरामद्धे, शेजारी, जवळपास सगळीकडेच या प्रकारचे वाद पाहत आलो आहेत आणि पुढेही हे वाद पाहत राहू. परंतु भविष्यात हा वाद उद्भवूनये म्हणून एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे मृत्यूपत्र. प्रॉपर्टीच्या हस्तांतरणामधील एक महत्वाचा दस्त म्हणून आपण ‘मृत्यूपत्राकडे’ पाहतो.

असे हे मृत्यूपत्र जर नोंदणीकृत असेल तर मग कायद्याच्या नजरेत या मृत्यूपत्राचे महत्व अजून जास्त वाढते असा आपल्या सर्वांचाच समज असतो, परंतु कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की, नोंदणीकृत मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरू शकते का? आजच्या या लेखात आपण याच प्रश्नावर सविस्तर माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.

आल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की नोंदणी कायद्यानुसार मृत्यूपत्राची नोंदणी करणे बंधनकारक नाही. हो, तुम्ही बरोबर वाचले. एखाद्या मृत्यूपत्राची नोंदणी करावी किंवा नाही हा ज्याचा-त्याचा ऐच्छिक प्रश्न आहे. परंतु, त्या मृत्यूपत्रासंबंधी भविष्यात काही वाद उद्भवला, त्या मृत्युपत्रावर एखाद्या वारसाने आक्षेप घेतला, तर ते मृत्यूपत्र कायद्याच्या कसोटीवर खरे उतरावे या दृष्टीकोणातून मृत्यूपत्राची नोंदणी करून घेणे फायद्याचे ठरते.

मित्रांनो, एखाद्या हस्तांतरनासाठी करार आणि नोंदणी या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. नोंदणी कायद्यानुसार ठरावीक काही करार नोंदणीकृत असणे हे बंधनकारक आहे, परंतु त्या व्यतिरिक्त इतर करारांची नोंदणी ही ऐच्छिक आहे. परंतु, याचा मुळीच असा अर्थ काढता येणार नाही की नोंदणीकृत करार हे कायदेशीर असतात तर नोंदणी न केलेले करार हे बेकायदेशीर असतात.

मुळात जर एखादा करारच जर बेकायदेशीर असेल, आणि अश्या बेकायदेशीर कराराची नोंदणी करून घेतली तर तो करार कायदेशीर होऊ शकतो का? तर मुळीच नाही. उदाहरणाद्वारे समजायचे झाले तर, समजा 15 वर्ष वय असलेल्या मुलाच्या नावावरील जमीन विक्री करण्यासाठीचा करार केला. पुढे त्या कराराची नोंदणी करून घेतली. तर तो करार कायद्याने वैध ठरू शकतो का? तर नाही, कारण कायद्याने 15 वर्ष वयाचा व्यक्ती हा करार करूच शकत नाही. त्यामुळे हा करारच बेकायदेशीर आहे. आणि असा बेकायदेशीर करार नोंदणीकृत जरी असेल तर तो कायदेशीर ठरू शकत नाही.

आता आपण आपल्या मूळ मुद्दयाकडे वळूया. नोंदणीकृत मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरू शकते का? या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात द्यायचे झाले तर ते ‘हो..नोंदणीकृत मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरू शकते’ असे असेल. आपण वरील उदाहरणामद्धे पाहिल्या प्रमाणे जर एखादा करार एखाद्या कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन करणारा असेल, एखादा करार एखाद्या व्यक्तीच्या हक्क आणि मर्यादेपालीकडचा असेल तर तो करार फक्त नोंदणीकृत आहे म्हणून कायदेशीर ठरू शकत नाही.

नोंदणी हे एखाद्या मृत्युपत्रासाठी एक खूप महत्वाचा भाग ठरतो, परंतु फक्त त्या एकाच निकषावर ते मृत्यूपत्र कायदेशीर मानणे चुकीचे ठरेल. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मृत्यूपत्र करण्यास सक्षम होती का? त्या व्यक्तीची मानसिक स्थिती मृत्यूपत्र करण्यास पूरक होती का? ती व्यक्ती एखाद्या दबावाखाली तर मृत्यूपत्र करत नाही ना? ते मृत्यूपत्र एकंदरीत कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासूनच एखादे नोंदणीकृत मृत्यूपत्र कायदेशीर आहे की बेकायदेशीर हे मे. दिवाणी न्यायाधीश ठरवू शकतात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *