काऊंटर क्लेम म्हणजे काय? वादीचा क्लेम काढून टाकल्यास काऊंटर क्लेम देखील काढला जातो का?

Infomative News

मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्‍याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.

मित्रांनो आपण असे ऐकले असेल किंवा अनुभव देखील घेतलेला असेल की वादीने कोर्टात दावा दाखल केला, प्रतिवादी त्या दाव्यात हजर राहिला आणि प्रतिवादीने वादीच्या दाव्यास ‘प्रतिदावा’ दाखल केला. याच प्रतिदाव्यास कायद्याच्या भाषेत ‘काऊंटर क्लेम’ असे म्हणतात.

काऊंटर क्लेम एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा सुरेश कडून पाच लाख रुपये येणे असल्याकारणाने रमेशने सुरेश विरुद्ध वसुलीसाठीचा दावा दाखल केला. तर दाव्यामध्ये सुरेश हजर होऊन काउंटर क्लेम दाखल केला आणि रमेश कडून दहा लाख रुपये वसूल होऊन मिळावे असे त्या काउंटर क्लेम मध्ये नमूद केले. तर इथे सुरेशला रमेश कडून दहा लाख रुपये येणे असल्याने त्याला त्यासाठी वेगळा दिवाणी दावा दाखल करावा लागणार नाही. सुरेश साठी काउंटर क्लेम दाखल केला तरी चालतो.

दिवाणी प्रक्रिया संहितेची ऑर्डर 8 रुल 6 ही काऊंटर क्लेम बद्दल आहे. यामधील पहिल्या भागामध्ये सांगितले आहे की जेव्हा वादी हा प्रतिवादी विरुद्ध दावा दाखल करतो तेव्हा प्रतिवादी त्याचा प्रतिवाद पत्राच्या एडिशन मध्ये काउंटर क्लेम देखील करू शकतो. परंतु हा काउंटर क्लेम प्रतिवादिस लिमिटेशन अॅक्टच्या अधीन राहून करावा लागतो.

ऑर्डर 8 रूल 6 मधील दुसर्‍या भागामध्ये असे सांगितले आहे की हा काउंटर क्लेम तसाच असतो जसे की वादीचा दावा असतो, म्हणजेच वादी हा प्रतिवादीच्या विरोधात दावा दाखल करतो त्याचप्रमाणे हा काउंटर क्लेम कोर्टा तर्फेविचारात घेतला जातो. पुढे असे देखील सांगितले आहे की प्रतिवादीच्या काउंटर क्लेमला वादीने कैफियत म्हणजे रिटन स्टेटमेंट द्यायचे असते.

वरील सर्व तरतुदी वरून तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असेल की जो काउंटर क्लेम असतो तो अगदी दाव्या सारखाच असतो आणि प्रतिवादी तर्फे काही दाद मागायची असेल तर प्रतिवादीस वेगळा दावा दाखल करावा लागत नाही. प्रतिवादी हा वादीच्या दाव्यामध्येच स्वतःची मागणी काउंटर क्लेम द्वारे करू शकतो.

आता आपण हे जाणून घेऊ की दाव्याच्या कोणत्या स्टेजला हा प्रतिदावा दाखल करावा? तर मित्रांनो जेंव्हा वादीच्या दाव्याची कैफियत दाखल करण्यासाठीची जी स्टेज आहे तेंव्हाच कैफियत सोबत काऊंटर क्लेम देखील दाखल करावा. सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयांमध्ये असे आलेले आहे की काउंटर क्लेम हा दाव्यामध्ये मुद्दे काढण्या-अगोदर शक्यतो दाखल करणे आवश्यक आहे.

आता असा एखादा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे की जर वादीचा दावाच कोर्टाने काढून टाकला तर प्रतिवादीने केलेल्या काउंटर क्लेमचे काय? कोर्ट काऊंटर क्लेम देखील काढून टाकणार की तो पुढे सुरू राहील? वरती आपण पाहिल्या प्रमाणे काऊंटर क्लेम हा एक प्रकारचा स्वतंत्र दावा असतो, यासाठी कोर्ट फिस देखील भरण्यात आलेली असते त्यामुळे वादीचा दावा काढून जारी टाकला तरी काऊंटर क्लेम पुढे चालू शकतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *