केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) डिसेंबर 2021 मध्ये लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आकडेवारीनुसार, 2015 ते 2021 पर्यंत एकूण 8,81,254 भारतीय नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) च्या अहवालानुसार, 38 देशांमध्ये 30 लाखांपेक्षा अधिक प्रवासी भारतीय राहतात. आज आपण या लेखामद्धे श्रीमंत भारतीयांचे इतर देशांमध्ये होणार्या स्थलांतराबद्दल अधिक जाणून घेऊया, सोबतच या स्थलांतराचे कारण काय आहे याबद्दल जाणून घेऊया.
दर वर्षी लाखो भारतीय नागरिकत्व सोडतात :
तत्कालीन गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत सांगितले होते की 1 जानेवारी 2015 ते 21 सप्टेंबर 2021 या कालावधीत एकूण 8,81,254 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण १,३३,८३,७१८ लोक जगातील विविध देशांमध्ये राहत आहेत. यामध्ये सर्वाधिक 2,56,476 लोक अमेरिकेत, 91,429 लोक कॅनडामध्ये, 86,933 लोक ऑस्ट्रेलियात आणि 66,193 लोक युनायटेड किंगडममध्ये राहत आहेत.
अर्थशास्त्रज्ञ श्रुती राजगोपालन म्हणतात की याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताची शिक्षण व्यवस्था अशी आहे जी फक्त सर्वोत्तम आणि गुणवान विद्यार्थ्यांची निवड करते. सोबतच भारताची अर्थव्यवस्था अजूनही नियंत्रित अर्थव्यवस्था आहे, जी श्रीमंत व्यक्तींसाठी अडथळा ठरते.
वाढती बेरोजगारी देखील आहे मुद्दा :
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात असे दिसून आले आहे की शिक्षणाचा स्तर जसजसा वाढत जातो तसतशी बेरोजगारीही वाढते. भारतामध्ये सर्व शिकूया, पुढे जाऊया सारखे अभियान यशस्वी रित्या अंमलात आणून साक्षरता वाढवली गेली परंतु त्या साक्षर विद्यार्थ्यांसाठी हवी तेवढी रोजगार निर्मिती मात्र झाली नाही. या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत पाचपैकी एक पदवीधर विद्यार्थी बेरोजगार होता. पदवीधर बेरोजगारांची टक्केवारी 2017 मध्ये 12.7 होती, तर 2018 मध्ये ही संख्या 13.2 टक्क्यांवर गेली.
नौकरीसाठी स्थलांतर :
परदेशात कामाचे तास, कामाची संस्कृती आणि कामाचे वातावरण भारताच्या तुलनेत खूपच चांगले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय नोकरीची स्थिरता, राहणीमान आणि चांगला पगार ही देश सोडण्याची मोठी कारणे आहेत. एका अहवालानुसार, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांपैकी 59% असे आहेत जे त्यांच्या करिअरमुळे परदेशात गेले आहेत.
टॅक्स बद्दलचे नियम :
डेलॉइट इंडियाच्या भागीदार सरस्वती कस्तुरीरंगन म्हणाल्या, “अनेक भारतीय UAE आणि सिंगापूर सारख्या देशांमध्ये निवास स्वीकारत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील उच्च इनकम टॅक्स दर आहे. “भारतात 30% कर दरापेक्षा 37% अधिभारासह, कमाल सीमांत दर 42.74% इतका उच्च आहे.
याशिवाय महिला आणि मुलांसाठी सुरक्षित जीवन, चांगली अर्थव्यवस्था, कमी प्रदूषण, चांगले हवामान, निसर्गाची उत्तम गुणवत्ता, मुलांच्या शिक्षणाच्या चांगल्या संधी, उत्तम आरोग्य सेवा आणि उत्तम राहणीमान ही देखील भारतातून स्थलांतराची महत्त्वाची कारणे आहेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.