सन 1981. UAE मधील शारजाह हे शहर. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना. ग्राऊंड च्या नावावर ओसाड जमीन आणि काँक्रीटची खेळपट्टी. प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगली सुविधाही नव्हती. हा सामना पाहण्यासाठी जास्त लोक येतील असे आयोजकांना वाटले नव्हते, पण 8-10 हजार प्रेक्षक तेथे पोहोचले. या सामन्याच्या यशाने UAE मध्ये क्रिकेटच्या लोकप्रियतेचा पाया घातला. विशेष म्हणजे तेव्हा UAE चा स्वतःचा क्रिकेट संघही नव्हता.
वर्षभरानंतर त्या ओसाड जमिनीवर हिरवेगार गवत असलेले क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले. एवढेच नाही तर त्यानंतरच्या काही वर्षांत यूएईमध्ये आणखी दोन हिरवेगार गवत असलेले जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधले गेले. आज दुबई स्टेडियमवर भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आहेत. आजच्या या लेखात वळवंटात बांधलेल्या या 3 क्रिकेट स्टेडीयमबद्दल काही रंजक माहिती पाहणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर करा.
पाकिस्तान मधून आणण्यात आली माती : UAE मध्ये क्रिकेट स्टेडियम बांधणे अवघड काम होते. विशेषत: दोन कारणांमुळे – एक म्हणजे तिथली गर्मी आणि दुसरे – वाळवंटामुळे स्टेडीयम बांधण्यासाठी जागा नव्हती. यासाठी बरेच संशोधन झाले. त्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिनाब आणि रावी नदीच्या दरम्यान असलेल्या गुजरावाला जिल्ह्यातील नंदीपूर भागातून माती आणण्यात आली. दोन नद्यांनी वेढलेल्या या भागातील सुपीक जमिनीत ६६% चिकणमाती आहे. या मातीबद्दल ऑस्ट्रेलियन प्रयोगशाळेत संशोधन करण्यात आले, तेव्हा असे आढळून आले की ही माती ऑस्ट्रेलियात मिळणार्या मातीशी मिळती-जुळती आहे. म्हणजेच क्रिकेट ग्राऊंडसाठी उपयुक्त माती आहे. शारजाहमधील स्टेडियमची खेळपट्टी याच मातीतून तयार करण्यात आली आहे.
अमेरिकेतून मागवले गेले गवत : आता खेळपट्टीत ओलावा कायम राहावा म्हणून गवताची गरज होती. यासाठी अमेरिकेतील एर्नी एल्स गोल्फ कोर्समधून गवत आणण्यात आले. जमीन हिरवीगार करण्यासाठी 200 मिमी जाडीचा नंदीपूर मातीचा थर जमिनीवर पसरवण्यात आला. त्यावर टिफवे 419 गवत वापरण्यात आले. हे गडद हिरवे बर्म्युडा गवत आहे. त्याची पाने दाट आणि मऊ असतात. त्यामुळे हे गवत सहजासहजी उपटत नाही. इतकेच नाही तर हे गवत हंगामातील उष्णतेचा आणि आर्द्रतेचा सहज सामना करते. त्याची मुळे 2 फूट खोल असतात त्यामुळे ते ग्राऊंड मधील मातीला बांधून ठेवते.
1982 मध्ये शारजाहमध्ये UAE चे पहिले क्रिकेट स्टेडियम बांधले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1984 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामना म्हणून येथे खेळला गेला. यानंतर 2004 मध्ये अबू धाबी आणि 2009 मध्ये दुबई येथे आणखी दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम तयार झाले. या दोन स्टेडियमची खेळपट्टी आणि मैदाने बनवण्यासाठीही शारजाह प्रमाणेच तंत्राचा वापर करण्यात आला.
ब्रिटीशांनी केली सुरुवात, भारत-पाकिस्तानने वाढवली लोकप्रियता : 19व्या शतकात प्रथमच क्रिकेटचा UAE मध्ये प्रवेश ब्रिटिशांच्या माध्यमातून झाला. त्यावेळी यूएई ब्रिटिशांच्या ताब्यात होते आणि ते ट्रुशियल स्टेट्स म्हणून ओळखले जात होते. तेव्हा ब्रिटीश सैन्यातील सैनिक देशभरात बांधलेल्या लष्करी तळांमध्ये छंद म्हणून क्रिकेट खेळत असत, परंतु ब्रिटिशांकडून यूएईच्या सामान्य लोकांपर्यंत क्रिकेट पोहोचल्याची एक वेगळीच कहाणी आहे.
19 व्या शतकात, रोजगार आणि उपजीविकेच्या शोधात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांसारख्या देशांमधून मोठ्या संख्येने लोक यूएईमध्ये पोहोचू लागले. या लोकांच्या माध्यमातून यूएईमध्ये क्रिकेट लोकप्रिय झाले. यूएई 1971 मध्ये ब्रिटीशांपासून स्वतंत्र झाला, परंतु त्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी तेथे एक क्रिकेट क्लब तयार झाला होता. नाव होते दार्जिलिंग क्रिकेट क्लब. ते बनवण्याचे श्रेयही भारत आणि पाकिस्तानच्या लोकांना जाते. त्यानंतर तिथे क्रिकेट अधिक लोकप्रिय झाले. 1977 मध्ये स्टार लोकल प्लेयर्स आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या शारजा आय संघ यांच्यात सामना खेळला गेला तेव्हा त्याचे वैशिष्ट्य दिसून आले. शेख सुलतान बिन मोहम्मद कासीमी यांच्यासह तीन हजार प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आले होते.
UAE क्रिकेटचे जनक म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती : इथल्या ओसाड जमिनीवर हिरवीगार मैदानं फुलवण्याचं श्रेय जातं – अब्दुल रहमान बुखातीर यांना. रहमान हे UAE मधील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. बुखातीर ग्रुपच्या नावाखाली त्यांचा व्यवसाय आता रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, आयटी, हेल्थ केअर, ऑइल अँड गॅस ते स्पोर्ट्स आणि लेजर या क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. रहमानचे बालपण पाकिस्तानात गेले. कराचीतील शालेय जीवनातच त्यांच्या मनात क्रिकेटची आवड निर्माण झाली. 1970 च्या दशकात रहमानला UAE मधील क्रिकेटची वाढती लोकप्रियता लक्षात आली की तेथील क्रिकेटचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. या कारणास्तव त्यांनी 1974 मध्ये शारजाह येथे स्थलांतरितांसाठी बुखातीर लीग सुरू केली.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.