मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
सिव्हिल लॉ हा खूपच किचकट आहे. कायद्याचे अभ्यासक देखील कित्येक वेळा विचारात पडतात, मग सामान्य लोकांची परिस्थिति काय होत असेल याचा विचार करणे देखील कठीण आहे. आता आपला आजचा विषयच बघा. आजोबांच्या प्रॉपर्टीवर नातू व नातीचा हक्क असतो ही जनसामान्यांची भावना असते. परंतु मी जर तुम्हाला संगितले की हे सत्य आहे परंतु पूर्णतः सत्य नाही, तर!! तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही गोंधळून जाल. काय करणार? हा कायदाच इतका किचकट आहे. पण, आपण या लेखात आपल्याला समजेल अश्या भाषेत या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
मित्रांनो, तुम्ही आमचे मागचे काही लेख वाचले असतील तर तुम्हाला आतापर्यंत एक गोष्ट समजलीच असेल की प्रॉपर्टी ही 2 प्रकारची असते. एक म्हणजे स्वकष्टार्जित ( स्वतः कामावलेली ) आणि दुसरी म्हणजे वडीलोपार्जित ( पूर्वजांकडून वारसहक्काने आलेली ). यामधील पहिला प्रकार जो आहे, तो खूपच साधा सरळ आणि सोपा आहे. त्याबद्दल न्यायालयात जास्त प्रकरणे येत नाहीत. परंतु दूसरा जो प्रकार आहे, त्यामुळे न्यायालयात प्रकरणांचा ढीग लागलेला आहे. वडीलोपार्जित जमिनीचे वाद इतके क्लिष्ट असतात की ते वर्षानुवर्ष चालतात. असो, आपण आपल्या विषयाकडे वळू.
प्रथम आपण स्वकष्टार्जित प्रॉपर्टी संबंधने आपल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आजोबांनी कष्ट करून काही प्रॉपर्टी विकत घेतली, तर ती त्यांची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी झाली. त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात आजोबा जीवंत असे पर्यंत ते स्वतः हवा तो निर्णय घेऊ शकतात. आजोबा हयात असताना त्यांना वाटले की ही प्रॉपर्टी विक्री करावी, एखाद्याला दान करावी तर त्यांच्याकडे तो हक्क आहे. त्यांचा मुलगा किंवा नातू, नात हे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाहीत. त्यांचा आजोबा हयात असताना आजोबांच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीवर कोणताही हक्क नसतो.
हे तर झाले आजोबांनी स्वतः कामावलेल्या प्रॉपर्टी बद्दल ते हयात असतानाचे अधिकार. परंतु, आजोबांच्या मृत्यू नंतर काय? तर याबाबत आजोबांनी मृत्यूपत्र करून ठेवले असेल तर काहीच वाद नाही. नोंदणीकृत मृत्यूपत्रा आधारे देखील ते त्या प्रॉपर्टी बद्दल हवा तसा निर्णय घेऊ शकतात. अगदी ते त्यांच्या मुला-मुलींच्या नावे न करता नातू किंवा नातीच्या किंवा दोघांच्या नावे करू शकतात. त्यामुळे इथे एक गोष्ट स्पष्ट होते की, आजोबांच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये नातू किंवा नातीचा कसलाही अधिकार नसतो जो पर्यंत आजोबा स्वतः त्यांना तो अधिकार हस्तांतरित करत नाहीत.
आता समजा, आजोबांच्या नावे असलेली प्रॉपर्टी त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून वारसहक्काने मिळालेली असेल, म्हणजेच आजोबांच्या नावे असलेली ती प्रॉपर्टी वडीलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर? आता इथे बर्याच क्लिष्ट कायदेशीर बाबी, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे न्यायनिर्णय समोर येतात. ह्या सर्व गोष्टी समजेल अश्या भाषेत सांगायचे झाले तर, हो आजोबांच्या प्रॉपर्टीवर नातू आणि नातीला हक्क सांगता येतो. परंतु, तो हक्क त्यांच्या वडिलांच्या मार्गे असतो.
म्हणजेच, नातू किंवा नातीला त्यांच्या आजोबांच्या प्रॉपर्टीवर डायरेक्ट हक्क मिळत नाही. तो हक्क त्यांना त्यांच्या वडिलांच्या मार्गे मिळतो. आजोबांच्या वडीलोपार्जित प्रॉपर्टीवर पहिल्यांच्या आजोबांच्या मुला-मुलींचा समान हक्क येतो. त्यानंतर नातवांचा त्यांच्या वडिलांच्या हिस्स्यातील जमिनीवर हक्क येतो. कोर्टात एखादे जुने असे प्रकरण पेंडिंग असेल आणि त्यामधील काही व्यक्ती आता हयात नसतील तर अश्या प्रकारच्या वडीलोपार्जित जमिनीच्या वादात 20-20 वादी-प्रतिवादी होतात. इतके हे प्रकरण क्लिष्ट होत जाते. असो, ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा. याबाबत तुमच्या मनात काही शंका असतील तर आपण कमेंट करून जरूर विचारा.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.