मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोणत्याही जमिनी करता सात-बारा हे अत्यंत महत्त्वाचं दस्तावेज आहे किंवा अत्यंत महत्त्वाचा महसुली अभिलेख आहे. आता तुम्ही कोणताही सातबारा उतारा हातात घेतात तेव्हा डाव्या हाताला वरच्या कोपऱ्यात तिथे सर्वे क्रमांक, हिस्सा क्रमांक किंवा गट क्रमांक असं लिहिलेलं असतं. त्या उताऱ्यामध्ये त्या जमिनीचा विभाग आणि उपविभाग क्रमांक अशी नावे दिलेली आहेत.
आजच्या या लेखात आपण सर्वे नंबर म्हणजे काय? हिस्सा नंबर म्हणजे काय? गट नंबर म्हणजे काय हे सविस्तर जाणून घेणार आहोत. या तिन्ही मध्ये नेमका फरक काय आहे हे देखील याद्वारे आपणास समजून येईल. त्यामुळे हा लेख आपण शेवटपर्यंत वाचा आणि लेख महितीशीर वाटल्यास शेअर नक्की करा.
जेव्हा कोणत्याही भागातल्या किंवा गावातल्या जमिनीचे सर्वेक्षण केलं जातं आणि त्या सर्वेक्षणानुसार त्या ठिकाणच्या विविध जमिनींची मोजणी केली जाते, त्यांच्या सीमा निश्चित केल्या जातात, तेव्हा प्रत्येक सीमा निश्चित असलेल्या जमिनीच्या तुकड्याला स्वतंत्र क्रमांक दिला जातो. तो क्रमांक म्हणजे सर्वे क्रमांक किंवा सर्वे नंबर.
याचा अर्थ असा की, कोणत्याही गावाची किंवा गावठाणाची किंवा एखाद्या विभागाची जेव्हा अधिकृत मोजणी होईल तेव्हा त्या भागात जमिनीचा प्रत्येक तुकडा मोजला जाईल. त्याच्या सीमा निश्चित केल्या जातील. असा प्रत्येक तुकडा, ज्याच्या मोजणी द्वारे सीमा निश्चित करण्यात आलेले आहेत अशा प्रत्येक तुकड्याला एक स्वतंत्र क्रमांक दिला जाईल ज्याला सर्वे क्रमांक म्हणतात.
सर्वे क्रमांक झाला की त्याच्या नंतर येतो हिस्से क्रमांक. हे हिस्से क्रमांक कुठून येतात तर जेव्हा मोजणी होते आणि सर्वे क्रमांक निश्चित केले जातात तेंव्हा कालांतरानी वाटप किंवा’ खरेदी-विक्री किंवा इतर कोणत्याही प्रकारे जेव्हा एखाद्या सर्वे क्रमांकाच्या जमिनीचे विभाजन होतं तेव्हा या विभाजित तुकड्याला एक स्वतंत्र क्रमांक दिला जातो आणि बहुतांश वेळा त्याला स्वतंत्र सर्वे क्रमांक न देता त्याला हिस्सा क्रमांक दिला जातो.
उदाहरणार्थ : कल्पना करा की सर्वे क्रमांक 10 मधील जमीन आहे. पुढे त्या जमिनीचे एकूण तीन तुकडे करण्यात आले. म्हणजे हिस्सा क्र.1 , हिस्सा क्र. 2 आणि हिस्सा क्र. 3. तर या तीन हिस्स्यांना स्वतंत्र सर्वे क्रमांक न देता त्यांना हिस्सा क्रमांक देण्यात येतो. जसे की, सर्वे क्र. 10 हिस्सा क्र. 1 , सर्वे क्र. 10 हिस्सा क्र. 2 आणि सर्वे क्र. 10 हिस्सा क्र. 3. यालाच म्हणतात जमिनीचा हिस्सा क्रमांक.
आजकाल बहुतेक 7/12 उतार्यावर गट क्रमांक दिसून येतो. आता हा गट क्रमांक कुठून आणि कसा आला? तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याकडे तुकडे बंदी तुकडे जोड कायदा आहे. या कायद्यानुसार ठराविक आकारापेक्षा लहान तुकडा स्वतंत्र करता येत नाही. तसंच काही छोट्या-छोट्या तुकड्यांच्या जमिनी असतात त्या एकत्र केल्या जातात आणि अशा जमिनी जेंव्हा एकत्र केल्या जातात त्या एकत्रित जमिनींना गट क्रमांक दिला जातो.
म्हणजे कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही गावांमध्ये जेव्हा तुकडे बंदी तुकडे जोड योजना किंवा एकत्रीकरण योजना राबवली जाते आणि त्या योजनेनुसार जमिनीचे विविध छोटे छोटे तुकडे एकत्र करून त्या एकत्रित तुकड्यांना एक गट क्रमांक दिला जातो. याचा अर्थ जेव्हा तुम्ही सातबारा उताऱ्यावर गट क्रमांक बघता तेव्हा तुम्हाला हे पटकन कळलं पाहिजे की ज्याअर्थी 7/12 उतार्यावर गट क्रमांक आहे त्याअर्थी इथे जमिनींना एकत्र करून किंवा काही सर्वे क्रमांक यांचे तुकडे एकत्रित करून एकत्रीकरण योजना राबवली गेली आहे. त्या एकत्रीकरण योजनेनुसार हा गट क्रमांक पडलेला आहे.
आता आपण पुन्हा जर तिन्ही गोष्टी एकत्र बघितल्या तर आपणास समजते की, जेंव्हा पहिल्यांदा मोजणी होते तेव्हा सर्वे क्रमांक दिला जातो. जेव्हा त्या सर्वे क्रमांकाचे विभाजन होते किंवा तुकडे केले जातात तेव्हा त्याला हिस्सा क्रमांक दिला जातो आणि जेव्हा एखाद्या विभागात एकत्रीकरण किंवा तुकडे बंदी तुकडे जोड योजना राबवली जाते तेंव्हा त्या एकत्रित तुकड्यांना गट क्रमांक दिला जातो.
हा लेख आपणास आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की आपला अभिप्राय नोंदवा. यासंबंधी आपले काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. पुढील लेखामद्धे आपण गट नंबर वरुन सर्वे नंबर कसा मिळवावा हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी भेट देत रहा आपल्या इन्फो इन मराठी वेबसाइट आणि फेसबुक पेजला. धन्यवाद.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.