मित्रांनो दैनंदिन जीवनात अश्या बर्याच गोष्टी घडत असतात ज्याचा कायद्याशी संबंध येतो. त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण कायद्याची पुस्तके, लेख वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांची भाषा आपणास समजणारी नसते. मग दूसरा पर्याय असतो तो वकिलांचे मार्गदर्शन घेण्याचा, परंतु बहुतेक वेळा आपणास त्यांची फिस परवडणारी नसते. त्यामुळे आपण कायद्याची माहिती देणारे आणि विशेष म्हणजे ती माहिती सामान्य व्यक्तिला समजेल अश्या भाषेत असणारे लेख वेळोवेळी आपल्या Info In Marathi या वेबसाईटवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून आपल्या हक्कांची, कायद्याची माहिती सामान्य लोकांना समजेल. ही माहिती आपणास फायदेशीर वाटली तर नक्की शेअर करा.
आपण काही सातबारा उताऱ्यावर पाहत असतो की इतर हक्कात ’84 (क)’ असे लिहिलेले असते. या लिहिलेल्या एका शब्दामुळे त्या जमिनीचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येत नाहीत. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी आपणास 84 (क) चा शेरा काढून घेणे बाबत सांगितले जाते. आजच्या या लेखामद्धे आपण 84 (क) हा शेरा कमी करण्यासाठी अर्ज कोठे करायचा किंवा कोण कोणत्या गोष्टी त्या अर्जामध्ये नमूद करायच्या ते जाणून घेऊ.
ज्यावेळेस कुळ कायदा यामधील कोणत्याही अर्जासंबंधी आपण विचार करतो तेव्हा तो अर्ज कुळ कायदा अव्वल कारकून तथा तहसीलदार साहेब यांच्याकडे दाखल करतो. परंतु या ठिकाणी 84 (क) बाबत निर्णय घेण्याचे आणि अर्ज चालविण्याचे अधिकार SDO साहेब यांना आहेत. हे अधिकार जिल्हाधिकारी साहेब यांनी सब डिव्हिजनल ऑफिसर यांना बहाल केलेले आहेत. पूर्वी 84 (क) शेरा कमी करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त तहसीलदार साहेबांना होते.
असे बदल वेळोवेळी होत असतात, त्यामुळे 84 (क) शेरा कमी करण्याआधी तुम्ही तुमच्या विभागातील तहसील कार्यालयात अथवा SDO ऑफिस मध्ये त्याबाबतची चौकशी करणे सोयीस्कर ठरते.
अर्ज कसा असावा ? : या हस्तलिखित किंवा कम्प्युटरवर टाईप केलेल्या अर्जावर सर्वप्रथम दिनांक लिहावी. त्यानंतर ज्यांच्या नावे तो अर्ज द्यायचा आहे त्यांचे पद नाम आणि त्यानंतर विषय लिहायचा आहे. विषयामध्ये ”कुळ कायदा कलम 84 (क) शेरा कमी करून मिळणे बाबत..” असे लिहावे. विषयाच्या खालच्या ओळीवर मान्यवर लिहावे. त्याच्या खालच्या ओळीपासून तुमचा मुख्य अर्ज सुरू होतो.
तुमच्या अर्जाच्या मुख्य परिच्छेद मध्ये तुमच्या विषयाचे सविस्तर वर्णन करावे. जसे की, ” मी किंवा माझ्या पूर्व हक्कदार यांनी अमुक गावामधील गट नंबर किंवा सर्वे नंबर मधील एवढे गुंठे जमीन खरेदी केली होती. त्यावेळेस ती जमीन पडीक होती आणि खरेदीच्या वेळी शेतकरी असले बाबतचा पुरावा न जोडल्यामुळे त्या जमिनीस 84 (क) असा शेरा नमूद झालेला आहे….”
आपल्या अर्जाच्या शेवटच्या भागात आपण आपली मागणी सादर करवायची असते. जसे की, ” …. तर सदर जमिनीच्या 7/12 उतार्यावरील 84 (क) हा शेरा कमी करून मिळावा. ठरलेली नजराणा रक्कम भरण्यास मी तयार आहे.” त्याखाली तुमची सही करुन तो अर्ज कार्यालयातील आवक-जावक विभागात जमा करून त्याची पोहोच घ्यावयाची असते.
अर्जसोबत तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जोडायचे असतात. जसे की चालू वर्षाचा सात-बारा उतारा. त्याच प्रमाणे खरेदीचा फेरफार ज्यामध्ये 84 (क) शेरा लागू केल्या बाबतचा उल्लेख असतो. त्याच प्रमाणे जमीन महानगर पालिकेच्या हद्दीत असेल तर त्याचा दाखला. सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे म्हणजे शेतकरी असले बाबतचा पुरावा.
नजराणा रक्कम किती असते? : नजराणा रक्कम दोन भागांमध्ये विभागलेले असते. जर आपला अर्ज हा कृषीक जमिनीसाठी म्हणजे शेतीच्या वापरासाठीच्या जमिनीसाठी असेल तर त्या जमिनीच्या चालू वर्षाच्या रेडीरेकनरच्या किमतीच्या 50 टक्के रक्कम नजराणा रक्कम म्हणून भरावे लागते. आणि जमिनीचा वापर शेती शिवाय इतर प्रयोजना करिता होत असेल तर अशा जमिनीच्या चालू वर्षाच्या रेडीरेकनर किमतीच्या 75 टक्के रक्कम नजराणा म्हणून भरावे लागते.
अशा प्रकारे आज आपण सात-बाराच्या इतर हक्कात असणाऱ्या 84 (क) बद्दल सविस्तर माहिती घेतली आहे. हा शेरा कोठे कमी करून घ्यायचा तसेच नजराणा रक्कम किती भरायची याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. हा लेख आपणास महत्वाचा आणि माहितीशीर वाटला असेल तर नक्कीच आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा. जेणेकरून त्यांना या विषयाची माहिती मिळेल.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.