देशाला आज नवे उपराष्ट्रपती मिळणार आहेत. पण तुम्हाला या पदाच्या महत्वाबद्द्ल किती माहिती आहे? जाणून घ्या या पदाचे महत्व.

Infomative

देशाला आज नवे उपराष्ट्रपती मिळणार आहेत. उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणार आहेत. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन उपराष्ट्रपतीची निवड होणार आहे. उपराष्ट्रपती हे पद प्राधान्यक्रमानुसार राष्ट्रपतीनंतर देशातील सर्वात मोठे घटनात्मक पद आहे. ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. कोणत्याही कारणास्तव राष्ट्रपती पद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपतीही त्यांची जबाबदारी घेतात.

उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो. राज्यघटनेच्या अनुच्छेद 66 मध्ये उपराष्ट्रपती निवडण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख आहे. ही निवडणूक आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे घेतली जाते. यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी मतदान केलेले असते. उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणुका घेणे आवश्यक आहे.

उपराष्ट्रपती महोदयांचा पगार किती असतो? : भारताच्या उपराष्ट्रपतींचा पगार संसदीय अधिकाऱ्यांच्या वेतन आणि भत्ते कायदा 1953 अंतर्गत निश्चित केला जातो. उपराष्ट्रपतींना वेगळे असे वेतन नाही. म्हणजेच उपराष्ट्रपती पदासाठी वेतनाची तरतूद नाही. मात्र त्यांना राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून पगार व इतर सुविधा दिल्या जातात. सध्या उपराष्ट्रपतींना राज्यसभेचे अध्यक्ष या पदासाठी दरमहा ४ लाख रुपये इतके वेतन दिले जाते. 2018 च्या अर्थसंकल्पात वेतनात सुधारणा करण्यात आली. यापूर्वी उपराष्ट्रपतींना 1.25 लाख रुपये प्रतिमहा वेतन मिळायचे. याशिवाय त्यांना भत्ते आणि पेन्शनची सुविधा मिळते. यामध्ये मोफत रेल्वे आणि विमान प्रवास, वैद्यकीय, दैनंदिन भत्ता, वाहन, लँडलाइन कनेक्शन, मोबाईल फोन सुविधा आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे.

उपराष्ट्रपतींना पेंशन मिळते का? : उपराष्ट्रपतींचे पेन्शन हे त्यांच्या पगाराच्या 50 टक्के असते. निवृत्तीनंतरही त्यांना पेन्शनसह सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत जेव्हा उपराष्ट्रपती आपली जबाबदारी घेतील, तेव्हा त्या काळात त्यांना राष्ट्रपतींचे वेतन दिले जाईल, अशी तरतूद घटनेत करण्यात आली आहे. म्हणजेच त्या काळात त्यांचा पगार राष्ट्रपतींइतकाच असेल. राष्ट्रपतींप्रमाणे त्यांना प्रत्येक सुविधा मिळतील.

उपराष्ट्रपती किती काळासाठी राष्ट्रपती पदावर कामकाज पाहू शकतात? : आत्तापर्यंतच्या माहितीमध्ये आपण समजून घेतले की उपराष्ट्रपती राज्यसभेत अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांच्या अनुपस्थितीत, उपसभापती राज्यसभेची जबाबदारी पार पाडतात. कोणत्याही कारणास्तव राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास, उपराष्ट्रपती त्या पदावर विराजमान होऊन राष्ट्रपतींची भूमिका बजावतात. जास्तीत जास्त ६ महिने इतक्या काळासाठी ते राष्ट्रपती पदाचे कामकाज पाहू शकतात. यानंतर निवडणूक घेऊन नवे राष्ट्रपती निवडणे आवश्यक आहे. 35 वर्षांचा कोणताही भारतीय नागरिक उपराष्ट्रपती होण्यास पात्र आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आपणास एखाद्या विषयावर अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही त्यावर लेख लिहून माहिती देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *